तोरणमाळच्या दुर्गम भागात खासदार डॉ. हिना गावितांनी ‘गाव चलो अभियानां’तर्गत केला घरोघरी संपर्क

नंदुरबार :  लोकसभा मतदारसंघातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तोरणमाळ भागात खासदार डॉ. हिना गावित यांनी भारतीय जनता पार्टीच्या ‘गाव चलो अभियान’ अंतर्गत घरोघर संपर्क केला. यावेळी दुर्गम आदिवासी बांधवांच्या विकासासाठी राबवलेल्या योजनांची माहिती देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले.

प्रत्येक गावातील ग्रामस्थांमध्ये राहून त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तसेच मोदी सरकारने राबवलेल्या विकास योजनांची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीने गाव चलो अभियान सुरू केले आहे. खासदार डॉ. हिना गावित यांनी या अभियानांतर्गत 14 फेब्रुवारी रोजी दुपारपासून तोरणमाळच्या दुर्गम भागात मुक्काम ठोकून संवाद साधण्याचे काम सुरू केले आहे. यात त्यांनी जुने तोरणमाळ नवे तोरणमाळ गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला केंद्र सरकारच्या योजनांचे माहिती पुस्तक दिले.

केंद्र सरकारच्या मार्फत राबविण्यात आलेल्या योजनांची माहिती त्यांनी ग्रामस्थांना दिली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी उभे राहून कमळ चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन केले. दुपारपासून रात्री उशिरापर्यंत ठीक ठिकाणी भेटी, घेणे पाड्यांमध्ये बैठका घेणे आणि संवाद साधून समस्या माहीत करून घेणे, यावर त्यांनी कार्यकर्त्यांनी भर दिला.