नंदुरबार : तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या घाटात बोगद्याची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
तोरणमाळ हे महाराष्ट्रातील महाबळेश्वरच्या नंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण आहे. म्हसावद ते तोरणमाळ या रस्त्यावर साधारणत: ३२ किमीचा घाट असून, त्या घाटात सर्व्हे करून टनेल (बोगदा ) ची निर्मिती केल्यास अंतर कमी होईल.
परिणामी, पर्यटन स्थळी पर्यटक येण्यास मोठ्या प्रमाणावर चालना मिळणार आहे. आज सापुताऱ्यापेक्षा तोरणमाळला बहुतांश प्रेक्षणीय स्थळे असून, घाटाचा रस्ता असल्याने, तसेच दळण- वळणाची साधने पुरेशी नसल्याने पर्यटकांचा पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही.
देशामध्ये रस्त्यांचे जाळे विणले गेले असून, विभागाच्या माध्यमातूनच तोरणमाळ या थंड हवेच्या ठिकाणाचा विकास होऊ शकतो. आपल्या कार्यकाळात हा टनेल (बोगदा) रस्ता करून, आदिवासी भागातील जनतेला न्याय द्यावा. असे मंत्री नितीन गडकरी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.