तोरणमाळ येणार मुख्य प्रवाहात; आठ महत्वपूर्ण रस्त्यांचे भूमिपूजन

धडगाव : प्रतिकूल भौगोलिक परिस्थितीमुळे रस्ते विकासापासून वंचित राहिलेल्या तोरणमाळ भागातील गाव-पाड्यांच्या सुविधेसाठी आठ महत्वपूर्ण रस्त्यांचे माजी मंत्री तथा आमदार ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. या भागातील बहुतांश दऱ्या व डोंगर कपारीतील गाव-पाडे विकासाच्या मुख्य प्रवाहात येणार आहेत.

राज्य शासनाने स्थगित केलेल्या रस्त्यांना मान्यता मिळाली. मान्यता मिळालेल्यांपैकी तोरणमाळ भागातील काही रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जि.प.सदस्य तथा गटनेते रतन पाडवी, सुनिल पाडवी, विक्रम पाडवी, रेहंज्या पावरा, जि.प.सदस्य जान्या पाडवी, ॲड. गोवाल पाडवी, युवक काँग्रेसचे धडगाव तालुकाध्यक्ष पोपटा वसावे, मोयचा गुरुजी, पं.स.सदस्य गोविंद पाडवी, विलास पाडवी, केवजी पाडवी, सुरेश वळवी, अमोल चव्हाण यांच्यासह तोरणमाळ व झापीचे सरपंच व परीसरातील पदाधिकारी उपस्थित होते.

हेंगलापाणी हा केलापाणी एक पाडा असून त्याची साधारण हजार ते बाराशेपर्यंत लोकवस्ती आहे. हा पाडा खोल दरीत असून चोहोबाजूंनी सहा-सात कि.मि.चे डोंगर आहे. येथील नागरिक नेहमीच समस्यांचा सामना करीत आले असून जंगली श्वापदांचा धोकाही ते पत्करत आहे. रस्ताच नसल्याने वाहन मिळावे म्हणून नागरिकांना पहाटेच घरुन निघावे लागते. त्यांना मोडलगाव, गोरंबा, लेगापाणी व तोरणमाळ येथे दोन तास चालल्यानंतर वाहन मिळते. मंजूर रस्त्यामुळे नागरिकांच्या काही अंशी समस्या सुटणार आहे.

 या कामांचे भूमीपूजन 

नवे तोरणमाळ ते तोरणादेवीमार्गे बुरमपाडा रस्ता, लेगापाणी ते खामचापाडा रस्ता , झापी ते बोदीबारीपाडा रस्ता, सीताखाई पाॅईंट ते तोरणमाळ रस्ता , तोरणमाळ ते आवशाबारीमार्गे म.प्र.सिमेपर्यंत रस्ता , तोरणमाळ भौतीपाडा ते पिंप्रीपाडा रस्ता , केलापाणी ते हेंगलापाणीपाडा रस्ता , नवे तोरणमाळचा भमणपाडा ते पिंपळबारीपाडा रस्ता, १३२ विद्युत उपकेंद्राचे बांधकाम करणे.