त्याग-बलिदानाची स्मृती जागविणारी माती!

– विजय निचकवडे

Honour of Tiranga देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी प्राणांची आहुती दिली. आज अशा वीरांचे स्मरण आम्हाला स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिनी होते आणि वर्षातून एकदा हुतात्मा दिनी. कर्कश्श आवाजात गाणे वाजवितो अन् वाहनांना तिरंगे बांधून रस्त्याने सुसाट पळत सुटतो. ही क्षणिक देशभक्ती आणि वीरांचे स्मरण नव्या आणि येणा-या पिढ्यांना वीरांचा सन्मान आणि देशप्रेमाची मात्रा देण्यास कदाचितच पुरेसे ठरेल. Honour of Tiranga अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील उपक्रम मात्र युवा पिढीत देशप्रेम जागविण्यासाठी आणि चिरकाल स्मृती टिकविण्यासाठी पोषक ठरण्यासारखा आहे. ‘माझी माती, माझा देश’ हा उपक्रम याचे प्रतीक म्हणावे लागेल. आपल्या मातीप्रती आणि पर्यायाने देशाप्रती प्रेम जागविणारा हा उपक्रम व्यापक असाच आहे.

देशाचे सर्वोच्च बलिदान देणा-या सर्वच वीरांनी या देशाची माती कपाळी लावूनच आपले सर्वस्व देशासाठी अर्पण केले. प्राणांचे बलिदान देणारे अनेक हुतात्मे, वीर याच मातीच्या कुशीत हसत हसत वीरगतीस गेले. आज अशा वीरांचे स्मरण आम्ही करतो, पण त्याला मर्यादा आल्या आहेत. ठरावीक दिवशी गाजावाजा झाला की आम्ही मोकळे. Honour of Tiranga पण खरंच एवढासा क्षणिक असा वीरांचा सन्मान त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यास पुरेसा आहे का? खरे तर आम्ही कितीही केले तरी अशा वीरांच्या कार्याची ‘सर’ आमच्या प्रयत्नांना येऊ शकत नाही; किमान त्या वीरांच्या आठवणींना जागे ठेवीत देशसेवेचा खारीचा का होईना, वाटा आम्ही नक्कीच उचलू शकतो. यासाठी आम्हाला आमची पद्धत आणि कृती बदलावी लागेल, हे तेवढेच खरे!

१५ ऑगस्ट, २६ जानेवारी किंवा हुतात्मा दिनी मोठमोठ्याने गाणे लावले आणि तिरंगे हातात घेऊन किंचाळत रस्त्याने फिरलो, म्हणजे हुतात्म्यांचा, वीरांचा सन्मान झाला, असा समज आपण करायचा का? जे तिरंगे हातात घेऊन फिरलो, ते रस्तोरस्ती जर पडून राहणार असतील तर हा सन्मान की अपमान हे ज्याचे त्याने ठरवावे. Honour of Tiranga आजपर्यंत आपण हेच करत आणि पाहात आलो. मात्र, मागील काही वर्षांत काही अंशी का होईना, यात परिवर्तन येताना दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोककल्याणकारी योजनांच्या बाबतीत जेवढे सकारात्मक आहेत, तेवढेच ते देशप्रेम आणि वीरांच्या सन्मानाची कदर करणारेही आहेत. म्हणून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव प्रचंड दिमाखात वर्षभर राबविला गेला. अनेक उपक्रम झाले.

Honour of Tiranga वर्षभरापूर्वी घराघरांवर, झोपड्या, वाड्यांवर लागलेले तिरंगे त्याचेच प्रतीक होते. या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता आता होणार आहे. या पृष्ठभूमीवर ‘माझी माती, माझा देश’ हा वीरांचा सन्मान करणारा आणि देशाप्रती प्रेम जागृत करणारा उपक्रम तेवढ्याच आदरपूर्वक आणि सन्मानाने राबविण्यास यंत्रणा सज्ज झाली आहे.भारतमातेप्रती आपुलकी निर्माण होऊन या मातीसाठी प्राणांची आहुती देणा-या वीरांचे स्मरण आजच्या तरुण आणि येऊ घातलेल्या नव्या पिढीला व्हावे यासाठी गाव पातळीवरून गोळा केलेली माती थेट दिल्लीच्या कर्तव्यपथावर नेली जाणार आहे. देशातील अनेक गावांना स्वातंत्र्यासाठी हुतात्मा झालेल्या वीरांची परंपरा आहे. ज्या मातीत ते घडले आणि त्याच मातीसाठी बलिदान दिले; त्यांचा सन्मान या निमित्ताने होणार आहे. गावातून तालुका आणि तालुक्यातून राज्य व नंतर देश पातळीवर दिल्ली येथे हे मातीचे कलश एकत्रित केले जाणार आहेत. Honour of Tiranga या मातीच्या कलशासोबत एक झाडही असणार आहे. ३० ऑगस्ट रोजी दिल्ली येथे पंतप्रधानांच्या उपस्थितीत कार्यक्रम होऊन देशभरातून आलेल्या ७५०० कलशातील मातीत झाड लावून राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या शेजारी अमृत वाटिका साकारली जाणार आहे.

वीरांच्या हौतात्म्याची कायम आठवण करून देणारी ही अमृत वाटिका नव्या पिढीला सदैव प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही. हे कलश घेऊन प्रत्येक तालुक्यातून एक युवा दिल्लीत पोहोचणार आहे. गावागावांतून दिल्लीत पोहोचलेली ही माती, भारताच्या एकतेचे दर्शन घडविणार आहे. Honour of Tiranga याच उपक्रमादरम्यान प्रत्येक ग्राम पंचायत स्तरावर वीरांचा सन्मान करणारे शिलालेख लावले जाणार आहेत. पंचप्राणाची शपथ, वसुंधरा वंदन होणार आहे. गावातील प्रत्येकाचा सहभाग या उपक्रमात व्हावा आणि त्यालाही देशाप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव व्हावी या दृष्टीने राबविला जाणारा ‘माझी माती, माझा देश’ हा उपक्रम युवकांमध्ये देशप्रेमाची ज्योत जागविण्यासाठी नक्कीच पोषक ठरेल, यात शंका नाही. देशाच्या मातीच्या माध्यमातून नव्या पिढीला देशप्रेमाची गोडी लावणारा हा अभिनव प्रयोग गावाची नाळ थेट राजधानीशी जोडणार, हे तेवढेच खरे! Honour of Tiranga