‘त्या’ लोकांवर एमपीडीएपेक्षाही कठोर कायदा राज्यात करावा लागेल ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई । दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. भेसळ करणाऱ्यांविरोधात एमपीडीएपेक्षाही कठोर असा राज्याचा स्वतंत्र कायदा करावा लागेल. तसेच अन्न पदार्थातील भेसळखोरांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल व्हावा यासाठी केंद्राला शिफारस करण्यात येईल”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

सह्याद्री अतिथीगृहावर नुकतीच या विषयावर बैठक पार पडली आहे. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दुधात भेसळ करणाऱ्यांविरोधात कठोरात कठोर पाऊल उचलणार असल्याचे संकेत दिले आहेत. “अन्न पदार्थातील भेसळ ही गंभीर बाब आहे. यामुळे विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यवर गंभीर दुष्परिणाम होतो. आपल्या भावी पिढीचेही नुकसान होणार आहे. कर्करोगांसारखा दुर्धर आजारही अनेकांना जडतो.

याच दरम्यान, राज्यातील दुधातील भेसळखोरांविरोधात अन्न व औषध प्रशासन आणि दुग्ध व्यवसाय विकास विभाग यांनी संयुक्त मोहीम प्रभावीपणे राबवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. अन्न पदार्थातील भेसळ व दूध तसेच दुग्धजन्य पदार्थांतील भेसळीविरोधात केंद्र आणि राज्य शासनाच्या दोन्ही यंत्रणांनी प्रभावीपणे कारवाईसाठी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा, मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्यासाठी दोन्ही विभागांना सहकार्य केले जाईल”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.