नाशिक : त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्मियांचा घुसण्याचा प्रयत्न प्रकरणात गृहमंत्र्यांच्या आदेशानंतर वेगाने हालचाली सुरु झाल्या आहे. घटनास्थळी नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक पोहचले असून त्यांनी चौकशी सुरु केली आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिरात 2 दिवसांपूर्वी इतर धर्मिय काही युवकांनी बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ब्राह्मण महासंघाने पोलिसांना पत्र देऊन चौकशी करण्याची मागणी केली होती. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही चौकशीचे आदेश दिले.त्यानंतर नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप हे त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात तळ ठोकून आहेत. त्यांनी पुरोहित संघ तसेच काही ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच मंदिर परिसराचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यानंतर फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू झाले आहे.
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी. शेखर पाटील यांनी सांगितले की, यासंपूर्ण प्रकरणाची माहिती घेत आहोत. तसेच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणी मंदिराचे सुरक्षा रक्षकांसह 5 ते 7 जणांची चौकशी केली जात आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर आणखी माहिती समोर येईल. आरोपींचा असे कृत्य करण्यामागे काय उद्देश होता, हे तपासानंतरच कळणार असल्याचे त्यांनी सांगितले.