थंडीची चाहूल लागताच अंडी महागली ; डझनामागे एवढ्या रुपयांची झाली वाढ

जळगाव । सध्या राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे. ढगाळ वातावरणामुळे गार वारे वाहत असल्यामुळे थंडी जाणवत आहे. हिवाळा सुरु होऊन जवळपास महिना होत आला परंतु हिवाळ्यात पडणारी कडाक्याची थंडी अद्यापही जाणवत नाही. मात्र यातच अंड्याचे दरात वाढ झाली आहे. डझनामागे १५ रुपयांनी भाववाढ झाली आहे. सर्वात जास्त प्रोटिनची मात्रा असलेला सर्वात स्वस्त पौष्टिक आहार म्हणून थंडीत अंडी खाण्याचे प्रमाण वाढल्यामुळे मागणीतही वाढ होते.

कोंबड्यांचे खाद्य असलेल्या मका व सोयाबीनच्या दरवाढीसह कुक्कुट पालनाचा खर्च वाढल्यामुळे पोल्ट्रीधारकांकडून अंड्यांची दरवाढ करताच किरकोळ व्यावसायिकांनीही वाढ केली आहे. यामुळे महिन्याभरापूर्वी ६ रुपयांचे एक अंडे आता ७ रुपयाला विकले जात आहे तर डझनाचा दर हा ६५ वरून ७५ वर आला आहे. तर एका क्रॅरेट अंड्यासाठी १६५ ते १७० रुपये मोजावे लागत आहे. थंडी वाढल्यास दर शंभरी पार करण्याची शक्यता असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.

थंडीच्या हंगामात नेहमीच अंड्याच्या किमतीत वाढ होते. मात्र ती वाढ किरकोळ असल्याने त्याचा जास्त परिणाम जाणवत नसतो. पण यावर्षी ही वाढ जास्त आहे. नवरात्रीपासून १० ते २० पैशांनी वाढ होती. काही दिवसात एकदम भाववाढ झाली, ५५ रुपये डझन असलेली अंडी ७० ते ७५ रुपयांवर पोहोचले. तर शेकड्याचे दर ५५० पर्यंत पोहोचले आहेत. वातावरणातील बदल व थंडी कमी असल्याने दर स्थिरावले आहे, थंडी वाढताच मागणीही वाढेल, यासह भावही शंभरी गाठतील अशी शक्यता अंडे विक्रेते विजय छाबडीया यांनी व्यक्त केली आहे.