थोड्याच वेळात संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये सुरू होणार एनडीएची बैठक

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीएचे सरकार स्थापनेचे प्रयत्न अधिक तीव्र झाले आहेत. थोड्याच वेळात संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या संसदीय पक्षाची बैठक सुरू होणार आहे.  या बैठकीत नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड होणार आहे. त्यांनतर सर्व मित्रपक्ष संध्याकाळी राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत.

लोकसभा निवडणुकीत एनडीएला 293 तर इंडिया आघाडीला 234 जागा मिळाल्या आहेत. बहुमताचा आकडा 272 आहे. अशा स्थितीत भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे मित्र पक्षांची गरज भासपली. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी भाजपला समर्थन दिले आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (रालोआ) सरकार सत्तेत येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनडीए आघाडीकडून आजच सरकार स्थापनेचा दावा केल्या जाण्याची शक्यता आहे.

एनडीएचं सरकार स्थापन होण्याआधी मंत्रिपदाची वाटाघाची सुरु झाली. दरम्यान दिल्लीत 8 किंवा 9 जूनला नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात. त्याचवेळी काही केंद्रीय मंत्र्यांनाही शपथ दिली जाईल. त्यामुळे मोदींच्या नेतृत्त्वाखालील एनडीएच्या या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे.