दगडफेक आणि जाळपोळ; आरोपींना पडणार महागात, होणार 11 कोटी वसूल

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यात 30 ऑक्टोबर रोजी हिंसक वळण लागले. आमदार प्रकाश सोळुंके आणि संदीप क्षीरसागर यांचे घर पेटवून देण्यात आले. आंदोलनाला लागलेले हिंसक वळण आता आरोपींना महागात पडणार आहे. सुमारे 11 कोटींची वसुली आरोपींकडून करण्यात येणार आहे.

बीड शहर आणि माजलगाव मध्ये झालेल्या हिंसाचारात अकरा कोटी रुपयांचे नुकसान झाले. या सर्व नुकसानीची वसुली या प्रकरणातील आरोपीकडून केली जाणार असून तसा अहवाल तयार होत आहे. आरोपींनी ही भरपाई दिली नाही तर त्यांच्या वैयक्तिक मालमत्ता जप्त करून वसुली होईल अशी माहिती बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिली आहे.

दरम्यान, बीडमधील अनेक ठिकाणी शासकीय कार्यालयं, राजकीय पक्षांची कार्यालयही आंदोलकांच्या तावडीतून सुटली नाहीत. त्यामुळे जाळपोळ पूर्वनियोजित कट असल्याची शक्यता आहे. कारण जाळपोळ करणारे बीड परिसरासोबत तालुक्याच्या बाहेरचे असल्याची माहिती समोर आली आहे.