Darpan : पहिलं साप्ताहिक वृत्तपत्र दर्पणचा काय आहे इतिहास

Darpan : देशात पहिलं वृत्तपत्र सुरु झालं ते 1780 मध्ये पण मराठीतील पहिलं वृत्तपत्र सुरु व्हायला साधारपणे 100 वर्षांचा कालावधी जाऊ द्यावा लागला. 1832 मध्ये बाळशास्त्री जांभेकरांनी मराठी वृत्तपत्राची सुरुवात केली आणि महाराष्ट्राच्या इतिहासात माध्यमांच्या युगाची नांदी झाली.

बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण हे साप्ताहिक वृत्तपत्र सुरु केलं. खरंतर ज्या काळात हे वृत्तपत्र सुरु झालं त्या काळात इंग्रजांची सत्ता हळूहळू रुजत होती. त्यामुळे देशातील लोकांसमोर त्यांच्या भाषेतून काही लोकजागृती करणं महत्त्वाचं होतं. त्याच पार्श्वभूमीवर बाळाशास्त्री जांभेकरांनी मराठी वृत्तपत्राची सुरुवात केली. त्यामुळे 6 जानेवारी हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.
दर्पणाची नांदी
समाजाचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी वार शुक्रवार इ.स. 1832 रोजी दर्पण नावाचे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. त्या दिवसाची आठवण म्हणून 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात “मराठी पत्रकार दिन” म्हणून साजरा केला जातो. ब्रिटिश राज्यकर्त्यांना कळावे म्हणून त्याकाळी दर्पणचा एक स्तंभ मराठीत व एक स्तंभ इंग्रजीत असे. या वृत्तपत्राने समता आणि व्यक्तिस्वातंत्र्य या तत्त्वांवर समाजाची उभारणी करण्याचा प्रयत्न केला. वृत्तपत्रातील मजकूर अर्धा इंग्रजी आणि अर्धा मराठी असे. सुरुवातीला हे पाक्षिक होते. भारतीयांना ‘देश-काळ-परिस्थिती’चे आणि ‘परदेशी राजव्यवहारा’चे ज्ञान मिळवण्यासाठी बाळशास्त्री जांभेकरांनी हे वृत्तपत्र सुरू केले. हे वृत्तपत्र सुरू करताना जांभेकरांनी वृत्तपत्र सुरू करणे मागचा उद्देश स्पष्ट करताना लिहिले होते की लोकांचे प्रबोधन करणे आणि मनोरंजन करणे या उद्देशाने दर्पण हे वृत्तपत्र सुरू करत आहोत.

दर्पणचा पहिला अंक प्रदर्शित
6 जानेवारी 1832 रोजी दर्पणचा पहिला अंक प्रकाशित झाला. या वृत्तपत्रात इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये मजकूर असायचा. या वर्तमानपत्राचा मुख्य उद्देश हा देशातील लोकांना परदेशातील गोष्टींविषयी सखोल ज्ञान प्राप्त करुन देणे आणि लोकांना त्या देशांची समृद्धीविषयी माहिती देणे हा होता. त्याचप्रमाणे देशातील लोकांना स्वतंत्रपणे विचार करता यावा हा प्रयत्न देखील या वृत्तपत्राच्या माध्यमातून करण्यात आला होता. या वृत्तपत्राची किंमत ही 1 रुपया होती. इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषांत प्रकाशित होणाऱ्या या वृत्तपत्राच्या अंकात दोन स्तंभ असत. उभ्या मजकुरात एक स्तंभ (कॉलम) मराठीत आणि एक इंग्रजीत असे. मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहिले आहे, हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी होता.

वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी लोकांना नवीन होती. त्यामुळे दर्पणचे वर्गणीदार सुरुवातीच्या काळात खूप कमी होते. पण हळूहळू लोकांमध्ये ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. दर्पण अशा रीतीने साडे आठ वर्षे चालले आणि जुलै 1840 मध्ये त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.

बाळशास्त्री जांभेकरांचा पुढाकार
मुंबईतल्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असताना आणि समाजात वावरताना बाळशास्त्रींना अनेक समस्या अस्वस्थ करीत होत्या. पारतंत्र्याने ग्रासलेला देश, याबरोबरच समाजातील अनेक रूढी, चालीरीती, अज्ञान, दारिद्र्य, भाकड समजुती यामुळे आपल्या समाजाचे प्रबोधन होत नसल्याचं जाणीव बाळशास्त्री जांभेकरांना झाली होती. त्यासाठी वृत्तपत्र काढावे, असे त्यांना वाटू लागले. या जाणिवेतून आपले सहयोगी गोविंद विठ्ठल कुंटे उर्फ भाऊ महाजनांच्या मदतीने त्यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र काढले.

दर्पण वृत्तपत्रासोबत मराठीतले पहिले मासिक ‘दिग्दर्शन’ त्यांनी इ.स. 1840 साली सुरु केले. ‘दिग्दर्शन’मधून ते भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, पदार्थ विज्ञान, निसर्ग विज्ञान, व्याकरण, गणित तसेच भूगोल आणि इतिहास या विषयांचे लेख, नकाशे आकृत्यांसह प्रकाशित करत होते. भाऊ दाजी लाड, दादाभाई नौरोजी हे त्यांचे विद्यार्थी त्यांना या कामी मदत करत असत. या मासिकाचे संपादक म्हणून बाळशास्त्री जांभेकरांनी 5 वर्ष काम पाहिलं.