---Advertisement---
Crime News : दर्शना पवारची हत्या करण्याचं राहुल हांडोरेने आधीच ठरवलं होतं, अशी महत्वाची माहिती पोलीस तपासात आता समोर आली आहे.
दर्शना पवारची हत्याच करायची याच उद्देशाने राहुल हंडोरे 12 जूनला राजगडाच्या पायथ्याशी पोहचला. राजगडावर ट्रेकिंगला जायचं हा केवळ बहाणा होता. ट्रेकच्या पहिल्या टप्प्यावर पोहचताच राहुलने दर्शनाकडे पुन्हा एकदा लग्नाचा विषय काढला. मात्र तिनं नकार देताच सोबत आणलेल्या कटरने राहुलने तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी होऊन दर्शना खाली कोसळल्यावर राहुलने मोठ्या दगडांनी तिच्यावर घाव घातले ज्यामध्ये दर्शनाचा मृत्यू झाला.
12 जूनला सोमवार होता. राजगडावर ट्रेकला जाणाऱ्यांची शनिवार आणि रविवार या दोन दिवशी मोठी गर्दी असते. मात्र दर्शनाची हत्याच करायची हे ठरवलेल्या राहुल हांडोरेने मुद्दाम सोमवारचा कमी गर्दीचा दिवस निवडला होता. सीतेचा माळ या ठिकाणी दर्शनाची हत्या होताना सोमवार असल्यानं आजूबाजूला कोणीही नव्हतं. त्यामुळं बरेच दिवस हत्येचा हा प्रकार उघडकीस आला नाही. याकाळात राहुल हांडोरेने अनेक राज्यांमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न केला.
राजगडाच्या पायथ्याशी हत्या केल्यानंतर राहुलने खेड शिवापूरच्या टोल नाक्याजवळ आपली गाडी पार्क केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सापडू नये म्हणून त्याने थेट पुणे स्टेशन गाठलं आणि सांगलीला गेला. त्यानंतर तो ट्रेनने गोव्याला गेला त्यानंतर त्यानं पोलिसांना चकवा देत थेट चंदीगढ गाठलं आणि त्यानंतर त्याने कोलकाता गाठलं आणि अखेर तो मुंबईत आला. हे सगळं करत असताना पुणे पोलीस त्याचा शोध घेतच होते. अखेर त्याला मुंबईतील अंधेरी परिसरात पोलिसांनी जेरबंद केलं.
राहुल हंडोरे आणि दर्शना पवार लहानपणापासून एकमेकांना ओळखत होते . पुण्यात दोघेही एमपीएससीची तयारी करत होते. मात्र दर्शना वन खात्याची परीक्षा उत्तीर्ण झाली आणि तिच्या घरच्यांनी तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी करून द्यायची तयारी सुरु केली. राहुल हांडोरेने दर्शना आणि तिच्या घरच्यांना सांगून पाहिलं की मला थोडा वेळ द्या, मी देखील एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होईन आणि दर्शनाशी लग्न करेन. पण दर्शना आणि तिच्या घरच्यांनी याला नकार दिल्यानं राहुल हांडोरेने दर्शनाच्या हत्येचा कट रचला आणि तो राजगडाच्या पायथ्याशी अंमलात आणला.