दर्शनाने लग्नासाठी नकार दिला अन् त्याने थेट हत्या केली, नेमकं काय घडलं?

dharshana pawar Murder Case : एमपीएससी परीक्षेतील टॉपर दर्शना पवार हत्याप्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी गुरुवारी संशयित आरोपी राहुल हंडोरे याला मुंबईतून अटक केली आहे. यानंतर पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन या हत्याप्रकरणातील काही तपशील जाहीर केले. तसेच उर्वरित माहिती अधिक चौकशीनंतर समोर येईल, असे पुण्याचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले.

या सगळ्या घडामोडी सुरु असतानाच आता या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे.ज्या दिवशी दर्शना पवार आणि राहुल हंडोरे हे दोघे दुचाकीवरुन राजगडावर गेले, तेव्हाचे हे सीसीटीव्ही फुटेज आहे. यात राहुल हांडोरे आणि दर्शना पवार दिसत आहेत. यावरुन हत्येच्या दिवशी राहुल हंडोरे आणि दर्शना पवार हे एकत्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. राहुलने पोलिसांना यापूर्वीच हत्येची कबुली दिल्याचे समजते. दर्शनाच्या हत्येनंतर राहुल हा वेगवेगळ्या राज्यात फिरत होता. पोलिसांनी त्याला मुंबई येथील अंधेरी रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतले आहे. तो रेल्वेने दुसऱ्या राज्यात पळून जाण्याचा तयारीत असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असल्याची माहिती दिली आहे.

लग्नासाठी नकार दिला अन् त्याने थेट हत्या केली 

दर्शना सोबत राहुलला लग्न करण्याची इच्छा होती. मात्र तिने त्याला नकार देखील दिला होता. १२ जूनला दोघेही राजगड येथे ट्रेकिंगसाठी दुचाकीवरून आले होते. असे सीसीटिव्ही फुटेज मध्ये दिसत आहे. मात्र काही वेळानंतर राहुल हा एकटाच वरून खाली येताना पहायला मिळत आहे. तिचे लग्न ठरले होते की नव्हते, तसेच सीसीटिव्ही बाबत देखील पोलिसांकडून अधिक माहिती मिळू शकलेली नाही. दर्शनाने दिलेला नकार हा राहुलच्या जिव्हारी लागला आणि गोड बोलून राहुलने तिला ट्रेकिंगला जाण्याच्या बहाण्याने राजगडावर नेले आणि तिचा घात केला, अशी माहिती समोर आली आहे.

18 जूनला दर्शना पवार हिचा मृतदेह सापडला होता. त्यानंतर ती राहुलसोबत ट्रेकला गेल्याचं समजल्यावर राहुलवर संशय व्यक्त केला जात होता. त्यानंतर 19 जूनला दर्शनाच्या पोस्टमार्टममधून दर्शनाची हत्या झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर या प्रकरणाची सखोल चौकशी करायला सुरुवात झाली. हत्या केल्यानंतर राहुल पसार होता. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी वाढला. त्याच्या आई वडिलांकडे देखील चौकशी केली होती. त्यानंतर पोलिसांनी पाच पथकं नेमली. त्यांनी नाशिक, मुंबई, सिन्नर, पुणे या ठिकाणी पथकं तपासासाठी पाठवण्यात आली होती. सलग चार दिवस या प्रकरणाचा शोध सुरु होता. त्याचं लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला असता पश्चिम बंगालमध्येही त्याचं लोकेशन पोलिसांना सापडलं होतं. या दरम्यान त्याने कुटुंबियांकडूनही पैसे मागवले होते. त्यांनीदेखील टप्प्याटप्प्याने पैसे पाठवले होते. पोलिसांना राहुलचा तपास करण्यासाठी राहुलच्या कुटुंबियांनीदेखील सहकार्य केलं होतं.