मुंबई : एमपीएससी उत्तीर्ण दर्शना पवार हत्या प्रकरणी मित्र राहुल हंडोरे याला अटक करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी राहुल हंडोरेला अटक केली आहे. लग्नाला नकार मिळाल्याने राहुल हंडोरे याने दर्शना पवारची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. चार दिवसांनी त्याला अटक करण्यात आली आहे.
या घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, काल रात्री राहुल हांडोरे याला अटक केली आहे. आज आरोपी राहुलला न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे. त्यानंतर त्याला पोलिस कोठडी देण्याची मागणी करण्यात येईल. त्यानंतर त्याची चौकशी सुरू होईल असं पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे. तर आरोपी राहुल हांडोरे यांची आणि दर्शनाची लहानपणापासूनची ओळख होती. लग्न करण्याच्या वादावरून त्याने दर्शनाची हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. राहुल पार्ट टाइम जॉब करत असतानाच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता. तर हत्येची कबुली राहुल याने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तर न्यायालयाने राहुलला कोठडी सुनावल्यानंतर सखोल चौकशी होईल. घटनेनंतर राहुल बंगालला गेला त्यानंतर तो मुंबईत पोहचला तो सातत्याने फिरत असल्यामुळे त्याला पकडणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिस त्याचं लोकेशन वारंवार तपासत होते. बंगालवरून मुंबईत येताच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं.
दर्शना पवारचा मृतदेह राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी आढळला होता. १२ जून रोजी ती राजगडावर राहुल हंडोरेसोबत फिरायला गेली होती. १८ जून रोजी राजगडावर दर्शना पवारचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. एमपीएससी उत्तीर्ण होऊन दर्शना पवार हिची वनअधिकारी पदी निवड झाली होती. त्यानिमित्त पुण्यात सत्कार समारंभाला उपस्थित राहिल्यानंतर दर्शना बेपत्ता होती. दरम्यान, दर्शनाचा मृतदेह सापडल्यानंतर तिचा मित्र राहुल हांडोरे याचा शोध पोलीस घेत होते.
दर्शनाची हत्या त्याने केल्याचा संशय आहे. राहुल हांडोरेचं शेवटचं लोकेशन कात्रजमध्ये दिसून आलं होतं. त्यानतंर दोन दिवसांनी दिल्लीत एटीएममधून पैसे काढल्याची माहिती समोर आली होती. तर १८ जून ला रात्री नातेवाईकांशी फोनवर बोलला होता. कोलकात्यातही त्याचं लोकेशन आढळलं होतं.