मुंबई : दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांना तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना क्रॉस मैदान देण्यात आलं आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क कोणाला मिळणार? याची उत्सुकता संपूर्ण राज्याला होती. शिवाजी पार्कसाठी शिवसेना आणि ठाकरे गट आग्रही होता. मात्र, हा वाद आता निवळला आहे.
यावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “ज्या मैदानावर दसरा मेळावा होईल ती सभा विक्रमी सभा होईल, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला रेकॉर्डब्रेक गर्दी होईल. ज्या ठिकाणी बाकीच्यांचा मेळावा होणार आहे. तिथे स्वतःच्या पक्षाबद्दल बोलण्यापेक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधींचं कौतुकच जास्त होईल.
शिवतीर्थावरील मेळावा म्हणजे काँग्रेसवर टीका, पण आताचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसच्या नेत्यांचे कौतुक करतात. त्यामुळे उरलेली शिवसेना ही काँग्रेसमय झाली आहे.” मैदानाच्या वादामध्ये न जाता जे मैदान आम्हाला मिळेल त्या मैदानावर जोरदार सभा करणं आणि बाळासाहेबांचे विचार शिवसैनिकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा हेतू असल्याचे उदय सामंत म्हणाले.