दहावी, बारावी पुरवणी परीक्षेत पास झालात? तुमच्यासाठी खुशखबर…

जळगाव : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळातर्फे जुलै, ऑगस्ट महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी व बारावीच्या पुनर्परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. विशेषतः आता या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आहे. अर्थात यामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील प्रथम वर्ष पदविका, थेट द्वितीय वर्ष पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहेत.

प्रवेशासाठी काय करावे?
पुनर्परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनी डीटीईच्या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे. त्यांना संस्थास्तरावर होणार असलेल्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येईल. संस्थेकडे अर्ज केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी संस्था पातळीवर तयार  केली जाणार आहे. संस्थेने ठरविलेल्या वेळापत्रकानुसार प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल. त्यासाठी विद्यार्थ्यांना थेट महाविद्यालयाची संपर्क साधावा लागणार आहे.

दहावी, बारावीच्या पुनर्परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्याथ्यांना तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारितील पदविका अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार आहेत. हे प्रवेश नॉन कॅपअंतर्गत होणार असून, खासगी व शासकीय महाविद्यालयात संस्था पातळीवरील कौन्सिलिंग फेरीत विद्याथ्यांना सहभागी होता येईल. मात्र, त्यांना शासनाच्या आर्थिक सवलती देय नसतील, अशी माहिती जळगाव शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य पराग पाटील यांनी दिली आहे.

या अभ्यासक्रमांसाठी नोंदणी सुरु
दहावीनंतरचे प्रथम वर्ष अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, वास्तुकला पदविका आणि बारावीनंतरचे थेट द्वितीय वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी संस्था पातळीवरील जागांसाठी नोंदणी, कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चित करणे ही प्रक्रिया प्रवेशाच्या अंतिम तारखेपर्यंत [कट ऑफ डेट) म्हणजेच दि. ८ सप्टेंबरपर्यंत आणि बारावीनंतरच्या औषधनिर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमांसाठी दि. २० सप्टेंबरपर्यंत सुरु आहे.