नवी दिल्ली । अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम पुन्हा एकदा चर्चेत आहे. दाऊदवर पाकिस्तानात विषप्रयोग झाल्याची बातमी समोर आली आहे. त्याच्यावर खान हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याचा दावाही पाकिस्तानी माध्यमांनी केला आहे. यानंतर भारतात पुन्हा एकदा दाऊदचा विषय चर्चेत आला. मात्र अशातच आता दाऊदबाबत पाकिस्तानी महिला पत्रकार आरजू काजिमी यांनी खळबळजनक दावा केला आहे.
नेमकं काय म्हणाली आरजू काजिमी?
पत्रकार आरजू काजिमी म्हणाल्या की, जगाच्या नजरेत देशाची प्रतिमा सुधारण्यासाठी पाकिस्तान असं करू शकतो, ज्यात दाऊद इब्राहिमला मारण्याचाही एक भाग आहे. आयएमएफ असो वा वर्ल्ड बँक सर्वांचा पाकिस्तानवर दबाव आहे. मागील काही काळात पाकिस्तानात अनेक टार्गेट किलिंग झालेत. परंतु आता लोक विचारायला लागलेत.
अखेर दहशतवादी संघटना चालवणारे त्यांचे प्रमुख कधी मारले जाणार. जगच नव्हे तर पाकिस्तानचा सर्वात जवळचा मित्र चीननेही पाकिस्तानात असे लोक नसायला हवेत असं म्हटलं. त्यामुळे पाकिस्तान स्वत: दाऊद इब्राहिमसारख्या लोकांना त्यांच्या वाटेतून दूर करत असण्याची शक्यता आहे.
तसेच दाऊद पाकिस्तानात आहे हे येथील सरकार स्वीकार करत नाही. कारण तो आजही भारतीय नागरिक म्हणून ओळखला जातो. पाकिस्तान अशा गोष्टी बाहेर येऊ देण्याची रिस्क घेणार नाही. परंतु जेव्हा कधीही काही घडते तेव्हा दाऊद पाकिस्तानातच आहे हे पुढे येते. जर दाऊद इब्राहिम इथं मारला गेला असेल किंवा आजाराने त्याचा मृत्यू झाला असेल तरीही पाकिस्तान हे कधीही समोर येऊ देणार नाही. कारण हे पाकिस्तानाला परवडणारे नसेल असंही पत्रकार आरजू काजिमी यांनी म्हटलं.