जळगाव : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून नरेश सोनवणे याने सतीश पाटील याला घरात घुसून बेदम मारहाण केली. ही घटना भुसावळ शहरातील कोळीवाडा परिसरात रविवार, 26 मे रोजी दुपारी 2 वाजता घडली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात 3 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
भुसावळ शहरातील कोळीवाडा परिसरात सतीश गुलाबराव पाटील (वय 41) हा तरुण आपला परिवारासह वास्तव्याला आहे. त्याच्या परिसरात नरेश रमेश सोनवणे हा तरुण देखील राहतो. रविवार, 26 मे रोजी दुपारी 2 वाजता नरेश सोनवणे हा सतीश पाटील यांच्याकडे आला. त्याने दारूसाठी पैसे मागितले. त्यावर सतीश पाटील यांनी पैसे दिले नाही. याचा राग आल्याने नरेश रमेश सोनवणे तसेच त्याची आई आणि त्याची पत्नी या तिघांनी सतीश पाटील यांच्या घरात घुसून त्यांना बेदम मारहाण करून जखमी केले.
या प्रकरणी सतीश पाटील यांनी सोमवारी 27 मे रोजी दुपारी 3 वाजता पोलिसात फिर्याद दिली. त्यानुसार मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार इकबाल सय्यद करीत आहे.