लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून, काही पक्षांसाठी ही लोकसभा निवडणूक अस्तित्वाची लढाई बनली आहे. त्यामुळे प्रत्येक एका मतदारसंघात विजय महत्त्वाचा बनला आहे. पराभव परवडणारा नाहीय. काहीही करुन विजय मिळवणं हेच उद्दिष्ट आहे. प्रचार करताना प्रसंगी भाषेचा स्तर घसरतोय. सध्या दोन्ही बाजूंकडून परस्परांवर जोरदार हल्ले चढवले जात आहेत. शाब्दीक हल्ले चढवताना प्रसंगी खालच्या पातळीवर टीका केली जातेय. ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी काल एका प्रचारसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर आता नव्या वादाला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाने प्रियंका चतुर्वेदी यांच्यावर अत्यंत व्यक्तीगत पातळीवरची टीका केली आहे.
काय म्हणाल्या होत्या प्रियंका चतुर्वेदी ?
महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दीना पाटील यांच्यासाठी मुंबईत एक प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. त्यात प्रियंका चतुर्वेदी बोलत होत्या. “एकनाथ शिंदे कोण आहेस तू? कोण आहेस तू? म्हणून मोठ्याने ओरडत होत्या. समोरची गर्दी गद्दार, गद्दार ओरडत होती. ठाण्यापर्यंत हा आवाज पोहोचला पाहिजे. गद्दार गद्दारच राहणार” अशी टीका प्रियांका चतुर्वेदी यांनी केली होती.
काय म्हणाल्या शीतल म्हात्रे ?
तुम्ही खासदारकी कशी मिळवलीए हे खरंतर लोकांना सांगितलं पाहिजे. मराठीचा गंध नसताना, कुठलंही कर्तृत्व नसताना.. शिवसेनेचा संबंध नसतानाही आपण खासदारकी मिळवली.
आता खासदारकीची टर्म संपत आल्यानंतर आपली जी तडफड चालली आहे ती आपल्या वक्तव्यातून दिसून येतेय. ‘बुलंदी’मधला डायलॉग तुम्हाला माहिती नसेल.. बिल्ली के दात गिरे नहीं और चली शेर के मुँह में हात डालने.. अशीच तुमची परिस्थिती झाली आहे.
काहीही संबंध नसताना दावोसला गुलाबी थंडीत तुम्ही काय केलंत, हे लोकांना सांगा. परत खासदारकी मिळावी, यासाठी तुम्ही गेल्या आठवड्यात कुणाकुणाला भेटलात? आणि माझ्याकडे आदित्यचे कसे फोटोग्राफ आहेत हे दाखवून तरी खासदारकी द्या.. असं सागणाऱ्या तुम्ही… त्यामुळे कुणाला बोलताय, याचा विचार करा आणि भान ठेवा.