नवी दिल्ली । देशात 15 ऑगस्टची तयारी सुरु झाली असताना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पुणे इसिस मॉड्यूलशी संबंधित सर्वात खतरनाक दहशतवाद्याला अटक केली आहे. रिजवान अली असं या अतिरेक्याचे नाव असून त्याच्या दिल्लीतील दर्यागंजमधून मुसक्या आवळल्या आहे. त्याच्याकडून पोलिसांनी काही हत्यार देखील जप्त केली आहे.
महत्वाचं म्हणजे दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या रिजवान या अतिरेक्यावर एनआयएने तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. रिजवान हा पुणे इसिस मोड्युल सोबत जोडला असल्याची माहिती पोलिसांनी दिली. एनआयएकडून रिजवान अलीसंदर्भात इनपूट दिल्ली पोलिसांना मिळाले. त्यानंतर रात्री 11 वाजता बायोडायवर्सिटी पार्क येथे त्याला अटक केली. त्याच्याकडून एक स्टार पिस्तूल, 3 कारतूस आणि 2 मोबाइल फोन जप्त केले आहे.
रिजवान पुणे आयएसआयएस मॉड्यूलमधील सर्वात धोकादायक अतिरेकी आहे. या मॉड्यूलमधून अनेकांना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. परंतु रिझवान फरार होता. त्याने दिल्ली, मुंबईतील अनेक व्हिव्हिआयपी भागांची तपासणी केली होती. रिझवान याला एनआयएने मोस्ट वॉन्टेडच्या यादीत टाकले होते. त्याने आयईडी तयार करुन त्याची चाचणी केली होती. तो त्यातील तज्ज्ञही होता. अतिरेक्यांची स्पेशल सेल टीमकडून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे.