---Advertisement---
जळगाव । ऐन दिवाळी तोंडावर खासगी बस वाहतूकदारांनी तिकीट दरात भरमसाठ वाढ केली. दिवाळीतील गर्दीमुळे खासगी बस वाहतुकीचे चांगभले होत असून सामान्य प्रवाशांचे दिवाळे निघत आहे. पुणे ते जळगाव प्रवासाचा तिकीट दर ४०० ते ९०० रुपयांवरून थेट २ हजार ते २ हजार ५०० रुपयांपर्यंत पोचले आहेत.
दिवाळी सणामुळे अनेक जण आपल्या गावी जातात. त्यासाठी रेल्वे तिकीटांची बुकींग तीन महिन्यांपूर्वी काही जणांनी करुन ठेवली आहे. परंतु अनेकांना रेल्वे तिकीट मिळाले नाही. त्यांना पर्याय खासगी प्रवासी वाहतुकीचा आहे. दिवाळीतील गर्दीचा फायदा घेत खासगी बसच्या तिकीट दरात भरमसाट वाढ करण्यात आली आहे.
पुणे ते जळगाव प्रवासाचा तिकीटदर ४०० ते ९०० रुपयांवरून थेट २ हजार ते २ हजार ५०० रुपयांपर्यंत पोचले आहेत. परंतु जळगाव ते पुणे तिकीट दर ४०० रुपये आहे. पुण्यावरुन गावी जाणाऱ्या लोकांची असलेल्या गर्दीमुळे तिकीट दर दुप्पटीपेक्षा जास्त वाढले आहे तर गावावरुन पुण्याकडे येणारे कोणी नसल्यामुळे तिकीट दर कमी आहे. पुणे येथून जळगावसाठी कमी रेल्वे असल्याचा फायदा खासगी बस वाहतूक करणारे घेत आहेत. जळगाव पुणे विमानसेवा नाही. परंतु जळगाव, मुंबई विमानसेवेचे तिकीट २५०० रुपये आहे. यामुळे बसपेक्षा विमानप्रवास स्वस्त आहे, असे म्हणावे लागले.