जळगाव । थकीत कर्जाच्या रक्कमेच्या पाच टक्के रक्कम भरण्याची परवानगी देण्याच्या मोबदल्यात दीड लाख रुपयांची लाच घेणाऱ्या भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटीचे अवसायक चैतन्य नासरे याच्यासह वसुली अधिकाऱ्याला दीड लाखांची लाच घेताना नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.
नेमका प्रकार काय?
बीएचआर मल्टी स्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीमधील गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात गाजले असून यात संचालक मंडळ कारागृहात असून नंतर देखील अनेकांनी यात घोळ केलेला आहे. यातच आता थेट पतसंस्थेचे अवसायक चैतन्य नासरे यांना अटक करण्यात आली आहे.
तक्रारदाराची आई आणि मोठा भाऊ यांनी बीएचआरमधून कर्ज घेतलेले होते. याची ‘वन टाईम सेटलमेंट’ करण्यासाठी त्यांनी बीएचआरचे अवसायक चैतन्य नासरे यांची भेट घेतली. याप्रसंगी त्यांची वसुली अधिकारी सुनील पाटील यांच्याशी भेट झाली. त्यांनी या प्रकरणात दीड लाख रूपयांची लाच मागितली. चैतन्य नासरे यांनी देखील हे पैसे सुनील पाटील यांच्याकडे देण्याचे सांगितले.
दरम्यान, या प्रकरणी संबंधीतांनी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली. तेथील पथकाने सापळा रचून मंगळवारी सायंकाळी अवसायक चैतन्य हरीभाऊ नासरे व वसुली अधिकारी सुनील गोपीचंद पाटील या दोघांना बीएचआरच्या एमआयडीसीतील मुख्य कार्यालयात लाच स्वीकारतांना रंगेहात अटक केली. रात्री उशीरा त्यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.