दुचाकी जाळली, महिलेलाही जिवंत जाळण्याचा प्रयत्न… पार्किंगच्या वादात तांडव

पार्किंगच्या वादातून महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाला. पुण्यात ही हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून घटनास्थळाच्या आजूबाजूच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले आहे. याप्रकरणी 4 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, इतरांच्या शोधात सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धीरज आणि महेश एकाच कॉम्प्लेक्समध्ये राहतात. पार्किंगवरून दोघांमध्ये वाद झाला. मात्र 17 फेब्रुवारीला हा वाद वाढत गेला. दरम्यान, धीरजने परिसरातील 12 ते 15 मित्रांना बोलावून पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या महेश राजे यांच्या कारची तोडफोड केली आणि नंतर दुचाकी पेटवून दिली. सर्व आरोपी दुचाकीवरून आले होते.

घटनेच्या वेळी तेथे एक महिला उपस्थित होती, जी संपूर्ण घटना पाहत होती. आरोपींनी महिलेवर पेट्रोल फेकून तिला जाळण्याचा प्रयत्न केला, मात्र महिलेने कसा तरी घरातून पळ काढला आणि तिचा जीव वाचवला. आरोपींनी ओळख लपवण्यासाठी तोंड कापडाने झाकले होते.

वर्षा गायकवाड असे पीडित महिलेचे नाव आहे. वर्षा गायकवाड या महेश राजे यांच्या घरात भाड्याने खोली घेऊन राहतात. याप्रकरणी पोलिसांनी आकाश, सूरज, नयन आणि विशाल ससाणे यांना ताब्यात घेतले आहे. मुख्य आरोपी फरार झाला आहे. चंदननगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनीषा पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेची प्रकृती चांगली आहे.