दुर्गम भागाची रस्त्याअभावी पायपीट; दळणवळणासाठी गाढवांचा आधार

नंदुरबार : देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला असला तरी राज्यकर्त्यांना आणि प्रशासनाला दुर्गम भागात मूलभूत सोयी सुविधा पोहचवण्यासाठी अद्याप देखील यश आलेलं नाही. परिणामी नागरिकांना दळणवळणासाठी गाढवांचा आधार घ्यावा लागतोय. त्यातच गरोदर माता, सर्पदंश रुग्ण, अश्यांना रुग्णालयात नेताना केवळ झोळीचा आधार घ्यावा लागतो, यामुळे अनेकांना प्राणही गमवावे लागल्याचे अनेकदा समोर आले आहे.

राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तोरणमाळच्या झापी, खडकी, कुंड्या, लाकडा, सावऱ्या आदी पाड्यांवर अद्याप रस्ता पोहचला नाही. त्यामुळे नागरिकांना दळणवळणासाठी गाढवांचा आधार घ्यावा लागतोय. खडकी गावातील रोहिदास पावरा (४५) हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांनी परिवाराचा गाडा चालवण्यासाठी घरी एक किराणा दुकान उघडला आहे.

मात्र, गावात अद्याप रस्ता पोहचला नसल्याने श्री. पावरा  दोन गाढवांच्या आधाराने किराणा सामान आणि इतर जीवन उपयोगी साहित्य आणत असतात. यासाठी त्यांना तब्बल २७  किलोमीटर पायपीट करावी लागते. यामुळे जवळजळ पूर्ण दिवस प्रवासात जात असल्याचे श्री. पावरा यांनी सांगितले.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७६ वर्षे उलटून देखील जिल्ह्याच्या दुर्गम भागातील नागरिकांना अशा यातना भोगाव्या लागत आहेत ही बाब अत्यंत दुर्दैवी. हे सर्व नागरिकांच्या मानवी व मुलभूत अधिकारांचे हनन आहे. आज एकीकडे देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा झाला तर दुसरीकडे दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या “जैसे थे” आहेत. त्यामुळे राज्यकर्ते आणि प्रशासन जाणून बुजून आमच्याकडे दुर्लक्ष करत आहेत का ? असा संतप्त सवाल येथील नागरिक करीत आहेत.