धुळे : बादलीत बुडून एका दीड वर्षीय बालिकेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना धुळे तालुक्यातील तिखी गावाजवळील गोपाळनगर वस्तीत गुरुवारी घडली. रागिणी रवींद्र ठाकरे असे मृत बालिकेचे नाव आहे.
रवींद्र उत्तम ठाकरे हे मूळचे कासोदा (जि. जळगाव) येथील कनाशी गावाजवळी रहिवासी असून, गेल्या काही वर्षापासून ते गोपाळनगर येथे वास्तव्यास आहेत. त्यांना दीड वर्षांची रागिणी ही मुलगी होती. गुरुवारी सकाळी ठाकरे कुटुंबीय घराजवळील शेतात कामाला गेले होते. त्यांनी रागिणीला शेतातील झाडाजवळ खेळण्यासाठी सोडले होते. त्या झाडाजवळ प्लास्टिकची मोठी बादली पाण्याने भरलेली होती. त्या बादलीजवळ ती खेळत होती.
खेळता खेळता तिच्या हातातील वाटी बादलीत पडली. ती वाटी काढण्याच्या प्रयत्नात तिचा तोल गेल्याने ती बादलीत पडली. तिच्या नाकातोंडात पाणी गेल्याने तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, बालिका दिसत नसल्याचे बघून तिच्या आईने तिला बघण्यासाठी बादलीकडे धाव घेतली असता, तिला मुलीचे पाय वर दिसले. मुलगी पाण्यात बुडाल्याचे बघताच आईने एकच हंबरडा फोडला.