जळगाव : अंगणात खेळत असतानाच अवघ्या दोन वर्षीय चिमुकल्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्याचा मृत्यू ओढवला. ही धक्कादायक घटना पिंप्री खुर्द (ता.धरणगाव) येथ बुधवारी सकाळी घडली. कार्तिक शशिकांत बडगुजर (वय 2) असे मयत बालकाचे नाव आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कुटुंबियांनी काळीज चिरणारा आक्रोश केला.
पिंप्री येथील शशिकांत बाबूलाल बडगुजर यांचा कार्तिक बडगुजर हा दोन वर्षाचा मुलगा आपल्या अंगणात खेळत असताना बुधवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अंगणात खेळून झाल्यानंतर कार्तिक घरात आला व अचानक जमिनीवर पडला. हे पाहून कार्तिकचे आजोबा बाबूलाल बडगुजर यांनी नातवाला उचलले परंतु तो कोणतीही हालचाल करत नव्हता त्यामुळे त्यांनी लागलीच डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी लहान बालकाला तपासून मृत घोषित केले.
हृदयविकाराने त्याचे निधन झाल्याचे त्यांनी सांगितले. अतिशय गोंडस व हुशार बालकाचा अचानक मृत्यू झाल्याने पालकांना मोठा मानसिक धक्का बसला. मृत कार्तिक हा पेपर एजन्सी धारक बाबूलाल काशीनाथ बडगुजर यांचा नातू होय. बुधवारी दुपारी दोन वाजता मृत कार्तिकवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे पिंप्री परीरात हळहळ व्यक्त करण्यात आली.