जळगाव : शेतकऱ्यांसमवेत कायम शेतात राबराब राबणाऱ्या लाडक्या सर्जा-राजाचा अर्थात बैलांचा सण म्हणजे बैलपोळा अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपला आहे. मात्र त्यापूर्वी जामनेर तालुक्यात दुदैवी घटना घडलीय.
पोळा सणासाठी बैलांना सजविण्याची तयारी करताना विठ्ठल देवचंद भडांगे (६२ रा. पहूर कसबे ता. जामनेर) या शेतकऱ्याचा बैलाखाली दबल्याने मृत्यू झाला. या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
जामनेर तालुक्यातील पहूर कसबे येथे विठ्ठल भडांगे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. पोळा सणाच्या पुर्वसंध्येला बैलांच्या शिंगाना कलर लावत असतांना अचानक ते बैलाखाली दबले गेले, त्यात त्यांचा दुदैवी मृत्यू झाला.
ही घटना शनिवार, ३१ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. यावेळी नातेवाईकांनी एकच अक्रोश केला हेाता. त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत असून पोळा सणावर दुःखाचे सावट पसरले आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.