ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरातील एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून लॅब्राडॉर जातीचा कुत्रा अंगावर पडल्याने चार वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी कुत्र्याच्या मालकाला अटक केली असून, तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, ६ रोजी सायंकाळी एक महिला आपल्या मुलीसह रस्त्यावरून बाजारात चालली होती. त्याचवेळी एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून लॅब्राडॉर जातीचा एक पाळीव कुत्रा त्या चारवर्षीय चिमुकलीच्या अंगावर पडला. या घटनेत ती मुलगी गंभीर जखमी झाली. त्यानंतर, तिला रूग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यानंतर, पोलिसांनी गुरूवारी रात्री त्या पाळीव कुत्र्याच्या मालकाला अटक केली.
या अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आहे. यामध्ये कुत्रा मुलीवर तुटून पडताना दिसत आहे. कुत्रा पडण्याचे स्पष्ट कारण व्हिडीओमध्ये दिसत नाही, त्यामुळे कुत्र्याने उडी मारली की कोणीतरी रस्त्यावर फेकले, अशी शंका व्यक्त होत आहे. पोलीस आणि ठाणे महापालिकेचे अधिकारी या प्रकरणाचा तपास करत आहेत.