दुर्दैवी ! गणपती विसर्जनासाठी गेला अन् पाण्यात बुडाला तरुण, गावात हळहळ

नंदुरबार : गणपती विसर्जन करताना अचानक पाण्याने भरलेल्या चारीचा कडा तुटला यामुळे १५ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्या. नंदुरबार जिल्हा रुग्णालयासमोरील तळ्यात रविवार, १५ रोजी ही घटना घडली. हर्षल पाटील (१५) असे मृत बालकाचे नाव आहे.

देशभरात रविवार, १५ रोजी अनेक घरगुती गणेशांचे विसर्जन करण्यात आले. हर्षल पाटील १५, रा. हनुमानखेडा, ता. पारोळा, जि. जळगाव) हा आपल्या नातेवाईकांबरोबर गणपती विसर्जनासाठी गेला होता.

नंदुरबार जिल्हा रुग्णालयासमोर असलेल्या तळ्यात ते गणपती विसर्जन करत होते. यावेळी तळ्याच्या काठावर असताना अचानक चारीचा कडा तुटला. यामुळे हर्षल हा पाण्यात कोसळला. त्याला वाचविण्यासाठी रस्त्याने जाणाऱ्या वाहनधारकांनी तसेच नातेवाईकांनी पाण्यात उडी घेतली. परंतु, हर्षल मिळून आला नाही. काही वेळाने तो सापडला, मात्र तोवर त्याचा मृत्यू झालेला होता.

नागरिकांच्या मदतीने त्यास जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणी अंती मयत घोषित केले. याबाबत आष्टे येथील श्रीराम पाटील यांनी दिलेल्या माहितीवरुन नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार विनायक सोनवणे करीत आहेत.