जळगाव : जिल्ह्यात एक दुर्दैवी घटना घडली आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत नाचताना चक्कर येवून कोसळल्याने तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. जितेंद्र ज्ञानेश्वर बाविस्कर (२८) असे मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील कानळदा येथे गणरायाचे विसर्जनाची गावातून मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये गावातील जितेंद्र बाविस्कर हा तरुण सहभागी झाला. मिरवणुकीमध्ये नाचत असताना सायंकाळच्या सुमारास जितेंद्रला अचानक चक्कर आले आणि तो जमिनीवर कोसळला.
गावातील तरुणांनी लागलीच खासगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती मयत घोषीत केले. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्राथमिक तपास पोहेकॉ विलास शिंदे हे करीत आहे.