धुळे : राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणूक मंगळवारी शांततेत आणि उत्साहात झाली. भक्तीपूर्ण वातावरणात पुढच्या वर्षी लवकर या… च्या जयघोष करत गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. दरम्यान, गणपती विसर्जनासाठी गेलेल्या दोन सख्ख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बिलाडी (ता.धुळे) परिसरात घडली. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली आहे.
ओम पाटील आणि यश पाटील असे मयत दोघं भावंडांचे नाव आहे. धुळे शहरातील बिलाडी परिसरात हे दोघे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. दरम्यान, काल मंगळवारी गणपती विसर्जनासाठी हे दोघेही भावंड परिसरातील तलावात गेले असता ही दुर्दैवी घटना घडली.
तलावातील खोलीचा अंदाज न आल्यामुळे या दोघेही सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला. परिसरातील नागरिकांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ बचाव कार्य करण्यात आले.
परंतु या दोघांना वाचविण्यात नागरिकांना यश आले नाही. या दोघांचे पार्थिव शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली आहे.
दरम्यान, चितोड गावात ट्रॅक्टरवर गणपती बाप्पाची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. दरम्यान, विसर्जन मिरवणुकीत ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विसर्जन मिरवणुकीत शिरला. यामुळे पुढे नाचणारे तीन लहान बालक ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला तर सहा जण गंभीर जखमी झाले. जखमींना धुळ्यातील हिरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ट्रॅक्टर चालक हा मध्य धुंदीत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली. संपूर्ण प्रकरणाचा तपास धुळे तालुका पोलीस करत आहेत.