नंदुरबार : गणेश विसर्जनासाठी गेलेल्या युवकाचा बँक वॉटरमध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना नागसर (ता. नंदुरबार) येथे घडली. राजू हिरालाल पवार (४२) असे मयत तरुणाचे नाव आहे.
नागसर येथील गणपती मूर्तीचे विसर्जन १२ रोजी विरचक धरणात करण्यात आले. यावेळी राजू पवार (४२) हा तरुण धरणाच्या बँक वॉटरमध्ये पोहत असताना खोल पाण्यात गेला. यामुळे त्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. गावकऱ्यांनी त्याचा शोध घेतला मात्र, तो मिळून आला नाही.
तालुका पोलीस ठाण्याचे हेकॉ मुकेश ठाकरे, सहकारी व तरुणांच्या मदतीने शोध घेतला. दुसऱ्या दिवशी शोध घेण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाकडून पट्टीचे पोहणाऱ्यांची मदत घेण्यात आली. यावेळी धरणात त्यांचा मृतदेह आढळून आला.
मयत राजू पवार यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्याला भाऊ विजय पवार यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास आष्टे पोलीस दूरक्षेत्राचे हेकाँ.काशिनाथ साळवे करीत आहेत.