नंदुरबार : पाय घसरून जिवलग मित्र बुडू लागला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात पाण्यात उतरलेल्या दुसऱ्या मित्राचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी गोमाई नदीतील पांडव लेणीजवळ घडली. जो बुडत होता तो सुरक्षीत आहे. प्रतीकेश विश्वनाथ पाटील (२०, रा. चिखली कानडी, ह.मु. विद्याविहार, ता. शहादा) असे मयत युवकाचे नाव आहे.
शहादा महाविद्यालयात द्वितीय वर्षात बी. फार्मसीचे शिक्षण घेत असलेले सूरज वाघ, हेमंत पाटील, पूर्वेश पटेल, प्रतीकेश पाटील हे चार मित्र रक्तदान करून शहादा- खेतिया रस्त्यावरील गोमाई नदीत पांडव लेणीजवळ स्नान करण्यासाठी गेले होते. त्यातला सूरज वाघ हा मित्र सर्वांच्या आधी नदीमध्ये उतरला. कुठलाही अंदाज न घेता तो खोल पाण्यात जात होता.
आपला जिवलग मित्र वाहत असल्याचे दिसताच ते तिन्ही मित्र नदीच्या पाण्यात उतरले आणि सूरज वाघ या मित्राला वाचविण्यासाठी यश आले. परंतु त्यातील प्रतीकेश विश्वनाथ पाटील हा युवक पाण्याचा प्रवाह प्रचंड होता आणि खोलीही जास्त होती त्यामुळे त्याला पाण्याचा अंदाज आला नसल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाला. एकुलता एक मुलगा असलेला प्रतीकेश महाविद्यालयातील हुशार व होतकरू विद्यार्थी होता. त्याचे वडील चारचाकी वाहन चालवून त्याचे शिक्षण करीत होते.