दुर्दैवी ! पतीला रुग्णालयात नेलं अन् पत्नीचाच हृदयविकाराने मृत्यू, पतीचाही जीवन संपविण्याचा प्रयत्न

जळगाव : जिल्हा परिषदेच्या जिल्हा महिला बालकल्याण विभागातील महिला अधिकारी मयुरी देवेंद्र राऊत करपे ( ३२,रा. दादावाडी परिसर, श्रीरामनगर) यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या दुखद वार्तेने नैराश्यात आलेले त्यांचे पती तथा जि.प. कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत यांनी इमारतीच्या सहाव्या मजल्याकडे कूच करत टोकाचे पाऊल उचलले. मात्र स्नेहीजणांच्या लक्षात प्रकार आल्याने अनर्थ टळला. ही घटना शनिवार, १४ रोजी दुपारी चार वाजता घडली.

प्राप्त माहितीनुसार, देवेंद्र राऊत हे जिल्हा परिषदेत जिल्हा कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांच्या पत्नी मयुरी राऊत करपे या जि.प.त महिला बालकल्याण विभागाच्या आकाशवाणी चौक परिसरातील कार्यालयात अधिकारी म्हणून कार्यरत होत्या. राऊत कुटुंब श्रीरामनगर येथे दोन मुलींसह वास्तव्यास आहेत.

शनिवार, १४ रोजी शासकीय सुटी असल्याने नियमित आरोग्य तपासणी करण्यासाठी देवेंद्र राऊत तसेच त्यांच्या पत्नी मयुरी राऊन दुपारी खाजगी हॉस्पिटलमध्ये जाण्यास निघाले. हॉस्पिटलच्या पायऱ्या चढून जात असताना मयुरी करपे – राऊत यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला व त्या जागेवर कोसळल्या.

त्यांना हॉस्पिटलमध्ये हलविले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासणीअंती मृत घोषित केले. ही वार्ता कानावर पडताच पती देवेंद्र राऊत स्तभ होऊन मानसिक नैराश्यात आले. ते कोणाला काही एक न सांगता इमारतीच्या सहाव्या मजल्याकडे जाऊ लागले. हा प्रकार लक्षात येताच त्यांच्या काही सहकाऱ्यांनी त्यांना थांबवित धीर दिला. त्यामुळे अनर्थ टळला.

मयुरी करपे यांचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आला. ही वार्ता कळताच जिल्हा परिषदेतील अनेक अधिकारी तसेच महिला बाल कल्याण कार्यालयातील अधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. या घटनेने अनेकांना जबर धक्का बसला. तर करपे राऊत कुटुंब शोकमग्न झाले. या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. राऊत दाम्पत्यास गौरी व गाथा या दोन मुली असून, घटना घडली तेव्हा त्या शाळेत गेल्या होत्या. मयुरी यांच्या अचानक निधनाने चिमुकल्या मुलींचे मातृछत्र हरविले आहे.