दुर्दैवी ! बैल विक्रीसाठी निघालेल्या पादचाऱ्यावर काळाचा घाला; चार बैलसह जागीच मृत्यू

जळगाव : भरधाव आयशरने बैल घेऊन जाणाऱ्या पादचाऱ्याला जोरदार धडक दिली. या अपघातात पादचारी व चार बैल ठार झाल्याची घटना पाल येथे घडली. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, शेख फिरोज शेख गंभीर (रा. बहादरपूर, जि. बऱ्हाणपूर, ह. मु. पाल) हा रावेर येथील शुक्रवारच्या बाजारात बैल विक्रीसाठी येत होता.

दरम्यान, हबीब तडवी यांच्या पेट्रोलपंपासमोर भरधाव येणाऱ्या ट्रकने (एमएच १९, झेड ५२८५) जोरदार धडक दिली. यात पादचारी शेख फिरोज शेख गंभीर हा व चार बैल जागीच ठार झाले. ही घटना शुक्रवार, २७ रोजी पहाटे अडीचच्या सुमारास घडली.

याबाबत शेख नजीम शेख रफीक यांनी रावेर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आयशर वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाहनचालक पिंटू (पूर्ण नाव माहित नाही) हा फरारी झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक तुषार पाटील तपास करीत आहेत.