नंदुरबार : पोळा सण म्हणजे शेतकऱ्याला वर्षभर साथ संगत देणाऱ्या बैलांची कृतज्ञता व्यक्त करणारा सण. आज सोमवार, २ रोजी प्रत्येक गावात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मात्र त्यापूर्वीच रनाळातील अल्पभूधारक शेतकरी कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. नाल्याच्या पाण्यात अडकलेल्या म्हशीला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात दोन संख्या भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
नंदुरबार तालुक्यातील रनाळा येथे अल्पभूधारक शेतकरी दगा धात्रक आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. त्यांचे दोन मुले विक्की आणि ज्ञानेश्वर हे म्हशी चारुन कुटूंबाचा उदरनिर्वाहासाठी हातभार लावत होते. रविवार, १ रोजी दोघे जण नेहमीप्रमाणे म्हशी चारण्यासाठी गेले होते. दगा धात्रक यांच्या रनाळे शिवारातील शेतालगत सटवाईबारीपाडा बंधारा आहे. त्यालगतच्या नाल्यात त्यांच्या म्हशी चरत असताना पाण्यात गेल्या.
बराच वेळ उलटूनदेखील काही केल्या म्हशी बाहेर येईना. यामुळे विक्की दगा धात्रक (२२) हा म्हशींना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडू लागला. मोठा भाऊ ज्ञानेश्वर दगा धात्रक (२५) याच्या लक्षात आल्याने तो भावाला वाचविण्याचा प्रयत्न करु लागला. मात्र, दोघे जण पाण्यात बुडाल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ऐन पोळ्याच्या पूर्वसंध्येला शेतकरी कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, दोघांचे नंदुरबार जिल्हा रुग्णालयात शव विच्छेदन करण्यात आले. याबाबत नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.