जळगाव : लेफ्टनंट कर्नल पदाच स्वप्न पाहणाऱ्या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. या घटनेने जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. प्रथम (यश) गोरख महाले (२२) असे तरुणाचे नाव आहे. हा तरुण प्रशिक्षणाच्या अंतिम टप्प्यात जखमी झाला होता. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, सरकारने या घटनेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी तरुणाच्या कुटुंबीयांनी केली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथील प्रथम (यश) गोरख महाले (२२) हा तरुण नुकताच भारतीय सैन्य दलात भरती झाला होता. त्यानंतर पुणेच्या खडकवासला येथील प्रशिक्षण केंद्रात तो प्रशिक्षण घेत होता. प्रशिक्षणाचा कालावधी अंतिम टप्प्यात असताना बॉक्सिंग खेळताना अचानक त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला पुण्याच्या सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार दरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवार (ता. १८ ऑक्टोबर) रोजी घडली.
या घटनेने चाळीसगाव तालुक्यासह सायगाव गावात शोककळा पसरली. गावातच शासकीय इतमामात काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. अंत्य संस्कारासाठी हजारो ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी भावी काळात लेफ्टनंट कर्नल पदाचं स्वप्न पाहणाऱ्या जवानाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. देशसेवा करण्याची संधी मिळण्याअगोदरच ही दुर्दैवी घटना घडल्याची खंत नातेवाईकांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, यशला तर आम्ही गमावले आहे. परंतु अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी सरकारने या घटनेची सखोल चौकशी करावी आणि पुन्हा अशा घटना घडणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जवानाच्या मृत्यूनंतर त्यांचे मामा डॉ. हेमंत शेवाये यांनी केली आहे.