जळगाव : येथील नारायणी मातृस्तवन मंडळातर्फे नवरात्रोत्सवानिमित्ताने महिलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. देवीच्या स्तोत्र पठणासोबत जगकल्याणाचा जोगवा मागितला जात आहे.नवरात्रोत्सवानिमित्ताने मंडळातर्फे शैलपुत्री, ब्रहमचारिणी चन्द्रघण्टा, कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी, महागौरी, सिद्धीदात्री अशा नऊ आदिशक्तीची आराधना करण्यात येत आहे. देवीच्या या विविध रूपांचे स्मरण करण्यात येत आहे.
जोगवा ही देवीच्या उपासनेतील एक संकल्पना आहे. जोगवा मागणे म्हणजे भिक्षा मागणे अथवा कृपाप्रसाद मागणे. देवीचा म्हणजे अंबा, भवानी, रेणुका आदि शक्तिदेवतांपुढे पदर पसरून कृपाप्रसाद मागितला जातो. देवीचा कुलधर्म म्हणूनही जोगवा मागितला जातो. मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला किंवा नवरात्रात जोगवा मागितला जातो.
परडीमध्ये देवी ठेवून किमान पाच घरी जाऊन मूठभर तांदूळ किंवा पीठ मागणे याला जोगवा मागणे असे म्हणतात. यानुसार नारायणी मातृस्तवन मंडळाच्या महिलांनीही जोगवा मागुन देवीला जगाचे कल्याण करण्याचे साकडे घातले आहे. या उपक्रमात कल्याणी घारपुरे, योगिता घारपुरे, माधुरी ओक, वंदना ओक, स्नेहा भुसारी, मनिषा म्हाळस, मनिषा थत्ते, रेवती कुरंभट्टी, सुनंदा देखमुख, मृणाल मदाने, भावना शिंदे, अश्विनी पटवर्धन, अंजली देशमुख, अपूर्वा वाणी, शर्मिला काळे यांनी सहभाग घेतला.
पहा व्हिडिओ: https://youtu.be/xNmGZPWlxGs?si=XjUm8x6V-IIjL4zs