नागपूर । गेल्या काही महिन्यांपासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण पाहायला मिळत असून आधीच्या सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्राचं नुकसान झाल्याची टीका सत्ताधारी पक्षांकडून केली जाते. त्याला विरोधी पक्षांकडूनही तेवढ्याच जोरकसपणे प्रत्युत्तर दिलं जातं. त्यातच आता उप-मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी उखाण्यातून विरोधकांवर निशाणा साधला. त्यांच्या याच उखाण्याची सर्वत्र चर्चा दिसून आली.
काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने दक्षिण-पश्चिम मंडळाकडून विकासाचे वाण हळदी कुंकू या कार्यक्रमाचा आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमृता फडणवीस यादेखील कार्यक्रमासाठी उपस्थित होत्या. यावेळी त्यांना उखाणा घेण्याचा आग्रह करण्यात आला. अमृता फडणवीस यांनी एक खास उखाणा घेतला, आणि त्यासह विरोधकांना टोलाही लगावला.
” देवेंद्रजींनी मारले नाकर्तेपणावर बाण आणि मी घेऊन आले विकासाचे वाण.. आपण सर्वांनी स्वीकारावे आणि एकत्र महाराष्ट्र करू निर्माण” असा खास उखाणा त्यांनी घेतला. यावेळी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्यांनी त्यांच्या या उखाणा आणि टोल्याला टाळ्या वाजवून दाद दिली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारांच्या महिलांसाठी असणाऱ्या अनेक योजना त्यांना समाजात सन्माने उभं राहण्याची संधी उपलब्ध करून दिल्याचं सांगितलं.