मुंबई : राज्यात होणार्या विधानसभा आणि देशात होणार्या लोकसभा निवडणुकांचे वेध सर्वपक्षीयांना लागले आहेत. आघाडी-युतीची चर्चा सुरू झालेली असताना मुख्यमंत्रीपदाच्या चेहेर्यांचीही चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे भारतीय जनता पक्षानं पुढील वर्षीच्या विधानसभा निवडणुका एकनाथ शिंदेंच्याच नेतृत्वाखाली लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे तर्कानुसार एकनाथ शिंदेच युतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणं अपेक्षित आहे. मात्र, त्यासंदर्भात अद्याप युतीमध्ये स्पष्ट भूमिका ठरली नसल्याचंच चित्र देवेंद्र फडणवीसांनी नुकत्याच केलेल्या विधानामुळे निर्माण झालं आहे.
देवेंद्र फडणवीसांनी रिपब्लिक भारत या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये यासंदर्भात केलेल्या विधानांमुळे चर्चेला उधाण आलं आहे. याआधी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वगुणांविषयी ठाम भूमिका मांडणार्या देवेंद्र फडणवीसांनी यावेळी बोलताना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याबाबत पक्षातील वरीष्ठ निर्णय घेतील, अशी भूमिका मांडली. कोणत्याही पक्षाला आणि कार्यकर्त्याला हेच वाटत असतं की आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा. पण २०२४ ची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच आम्ही लढवू. जो मुख्यमंत्री असतो, तोच सरकारचा नेता असतो, त्याच्याच नेतृत्वात निवडणुका लढवल्या जातात, असं फडणवीस यावेळी म्हणाले.
मात्र, नेत्याच्या नेतृत्वात निवडणुका लढवणं आणि निवडणुकांनंतर त्या व्यक्तीला मुख्यमंत्रीपदी बसवणं या दोन वेगळ्या गोष्टी असतात अशी विचारणा करण्यात आल्यानंतर फडणवीसांनी त्यावर सूचक प्रतिक्रिया दिली. जर त्या वेळी आमच्या पक्षाला कोणता दुसरा निर्णय घ्यायची गरज असेल, तर पक्ष तो निर्णय घेईल. पण मला वाटत नाही की दुसरा कुठला निर्णय घेण्याची गरज आहे, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. कोण मुख्यमंत्री असेल, हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना विचारायला हवं. भाजपामध्ये सगळे निर्णय संसदीय समिती घेते. यासंदर्भात काही बोलण्याचाही अधिकार मला नाहीये, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.