देशभरात उष्णतेची लाट, केंद्रीय आरोग्यमंत्री काय म्हणाले?

नवी दिल्ली : देशभरातील अनेक भागात कडाक्याच्या उन्हामुळे उष्माघात होऊन अनेकांचा मृत्यू झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविया यांनी उच्चस्तरीय बैठकीत सार्वजनिक आरोग्य सज्जतेचा आढावा घेतला. बैठकीस निति आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ व्ही के पॉल, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) महासंचालक डॉ राजीव बहल आणि भारतीय हवामान विभागाचे (आयएमडी) अधिकारी आणि इतर तज्ञ उपस्थित होते.

यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी देशातील परस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ट्विटद्वारे ते म्हणाले, देशभरात कडाक्याच्या उष्णतेमुळे उद्भवणाऱ्या समस्या आणि सार्वजनिक आरोग्याच्या तयारीबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली. ज्या राज्यांमध्ये उष्माघाताचा प्रभाव आहे आणि उष्माघात झाला आहे अशा राज्यांमध्ये केंद्र सरकारचे पथक जाणार आहे. उष्णतेची लाट सुरू असलेल्या किंवा सुरू राहण्याची शक्यता असलेल्या राज्यांचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि मंत्री यांच्याशी चर्चा करतील जेणेकरून उष्माघाताबाबत योग्य निर्णय घेता येतील. भविष्यात उष्णतेची लाट आणि उष्माघातामुळे होणारे मृत्यू टाळण्यासाठी आयसीएमआरला अल्पकालीन आणि दीर्घकालीन योजना तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असेही डॉ. मांडविया यांनी यावेळी सांगितले.