देशाच्या इतिहासात आज अत्यंत महत्त्वाचा दिवस; जाणून घ्या सर्व काही

मुंबई : कलम ३७० रद्द करण्याबाबतचा केंद्र सरकारचा निर्णय हा जम्मु-काश्मीरच्या लोकांचा विजय असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय खंडपीठाने घेतलेल्या जम्मु-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय कायम ठेवण्याच्या निर्णयावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “देशाच्या इतिहासात आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात भारत सरकारने घेतलेल्या काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० रद्द करण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने मोहोर उमटवली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे भारताबरोबरच जम्मु-काश्मीरच्या लोकांचा विजय झाला आहे.”

ते पुढे म्हणाले की, “कलम ३७० मुळे जम्मु-काश्मीर हे विकासाचा आगार होण्याऐवजी दहशतवाद्यांचा आगार झालं होतं. परंतू, आज ३७० रद्द केल्यानंतर खऱ्या अर्थाने दहशतवाद कमी झाला आणि विकासही वाढला आहे. सर्वोच्च न्यायालयाने आता ३७० पुर्णपणे संपवल्यामुळे जम्मु-काश्मीरमध्ये एक नवीन पहाट झाली आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यामुळे जम्मु-काश्मीरच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला आणि एकसंघ भारत प्रस्थापित झाला आहे, असेही ते म्हणाले. तसेच यासाठी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभारही मानले.

उद्धव ठाकरेंना बोलण्याचा अधिकार नाही

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी कलम ३७० हटवावे अशी मागणी केली होती. ती पुर्ण करण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले आहे. पण ज्यावेळी ते हे काम करत होते तेव्हा उद्धव ठाकरे सेनेची भुमिका ही लोकसभेत वेगळी, राज्यसभेत वेगळी, इकडेही आणि तिकडेही अशी राहिली आहे. त्यामुळे त्यांना यासंदर्भात बोलण्याचा अधिकारच नाही, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले आहे.