शहादा : शहादा /दोंडाईचा रस्त्यावरील सारंगखेडा येथील मॉ वाघेश्वरी पेट्रोल पंपाजवळ कापसाचा भरलेला पिकअपवाहन व दुचाकी वाहनाचा समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये शहादा तालुक्यातील दोन तरुण ठार झाले. हा अपघात बुधवार, ३० रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडला .
शहादा /दोंडाईचा रस्त्यावर सारंगखेडा गावापासून दोन किलोमिटर अंतरावर मॉं वाघेश्र्वरी पेट्रोल पंपाच्या जवळ शहादा कडे जाणारी पीकअप वाहन क्रमांक एम. एच. १३ सी यू ३८०२ या गाडीने समोरून येणाऱ्या दुचाकी वाहनास क्रमांक एम.एच. ४२ एन १७१२ जोरात धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाले . अपघाताची घटना लक्षात येताच सारंगखेडा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक श्री . बागुल व उपनिरीक्षक किरण बारे यांनी तत्काळ धाव घेतली. सारंगखेडा गावातील नागरिकांनी मिळून अपघात झालेल्यांना रुग्णवाहिकेत उचलून ठेवण्यात मदत केली. सारंगखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी तपासणी अंती मृत घोषित करून शवविच्छेदन करण्यात आले. मयत धरासिंग दिनकर मोरे शिरुड ता. शहादा व विजय इंदा पवार रा. अमोदा ता. शहादा येथील रहिवासी होते. पीकअप वाहनात कापूस भरलेला होता .वाहन चालक वडणे ता. धुळे येथून शहाद्या कडे जात असताना अपघात झाला.
सारंगखेडा शहादा रस्त्याच्या काम पूर्ण झाले आहे. या रस्त्याची दुरुस्तीसाठी अनेक आंदोलने झाली होती . रस्त्याची दुरावस्थेमुळे व त्याच्यात जागोजागी खड्डे असल्याने अनेक अपघात होऊन अनेकांनी जीव गमावले होते. त्यामुळे नवीन रस्ता तयार करण्यात आला. परंतु आता रस्ता चांगला झाल्यामुळे वाहने सुसाट वेगाने जोरात धावताना दिसत आहेत. शंभर ते १२० किलोमीटर प्रती तास वेगाने सुसाट धावताना दिसत आहे. धूम स्टाईल ने वाहन चालवणारे तरुण तसेच स्टंट बाजी करणाऱ्यावर लक्ष देणे गरजेचे झाले आहे. वाहतूक नियंत्रण शाखेला सुसाट धावणाऱ्या वाहनांना नियंत्रित करणे हे एक मोठे आव्हान असणार आहे. अपघात होऊ नये यासाठी प्रशासनाने वाहतूक नियमांची अंलबजावणी केली पाहिजे अशी मागणी जनतेकडून होत आहे .