दोन सख्ख्या भावांसह तिसऱ्या आतेभावाचा धरणात बुडाल्याने मृत्यू; १९ वर्षीय तरुणीचं टोकाचं पाऊल

जळगाव : वरणगाव, पारोळा आणि जामनेर तालुक्यात घडलेल्या विविध घटनेत चार जणांचा मृत्यू झाला. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली.

विषारी औषध घेतले, उपचारादरम्यान मृत्यू
वरणगाव येथे एका १९ वर्षीय तरुणीने राहत्या घरात विषारी औषध घेतले होते. दरम्यान, उपचार सुरु असताना शनिवार, ३ ऑगस्ट रोजी सकाळी १०. ३० वाजता तिचा मृत्यू झाला. ख़ुशी चिंधू चांदणे (१९, रा. वरणगाव ता. भुसावळ) असे मयत तरुणीचे नाव आहे. याबाबत वरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

दुचाकीच्या धडकेत जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
जामनेर तालुक्यातील मुंदखेडा येथून खडकीदरम्यान रस्त्यावर दोन दुचाकींच्या धडकेत ३३ वर्षीय तरुण हा १२ जुलै रोजी गंभीर जखमी झाला होता. त्याच्यावर २० दिवसांपासून खाजगी व नंतर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना शनिवार, ३ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. शिवदास सोनु पवार (वय ३३, रा. मुंदखेडा ता. जामनेर) असे मयत तरुणाचे नाव आहे. याबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात प्राथमिक अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे मुंदखेडा गावात हळहळ व्यक्त होत आहे.

धरणात बुडाल्याने तिघांचा मृत्यू
पारोळा तालुक्यातील भोकरबारी येथील धरणात बुडाल्याने तिघा मुलांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. मोहंमद एजाज, मोहंमद हसन आणि आवेश रजा अशी मयत मुलांची नावे आहेत. यापैकी मोहंमद एजाज ( 12) आणि मोहंमद हसन (16) हे दोन सख्खे भाऊ असून पारोळ्यातील बडा मोहल्ला येथील ते रहिवासी आहेत. आवेश हा त्यांचा आतेभाऊ आहे. तो मालेगाव येथील रहिवासी असून खास उरूसासाठी तो पारोळा येथे आपल्या मामाकडे आला असता त्याच्यावर काळाने झडप घातली. दरम्यान, या दुर्घटनेमुळे पारोळ्यातील बडा मोहल्ला या परिसरावर शोककळा पसरली आहे.