‘द केरला स्टोरी’ मागचे वास्तव तुम्हाला माहितेय का?

तरुण भारत लाईव्ह । योगेश रंगनाथ निकम । स्त्री पुरूष समानतेच्या पोकळ गप्पा मारणाऱ्या कम्युनिस्टांनी आणि हिंदूंना धर्मनिरपेक्षतेचे डोस पाजत प्रत्यक्षात मुस्लिम लांगूलचालन करणाऱ्या कॉग्रेसने, भारतातील एका सुंदर प्रदेशातील मुलींची अवस्था किती भयावह करून ठेवली आहे, याची कटू व दु:खद कहाणी म्हणजे ‘द केरला स्टोरी’ होय. त्यामुळे, प्रत्येक सज्ञान भारतीय हा चित्रपट बघेल अशी अपेक्षा आहे. परंतु त्यासोबतच, एक धोक्याची सूचना देऊन ठेवलेली बरी. ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट पाहिल्यानंतर, ‘लव जिहाद’ ला बळी पडून ज्या मुली धर्मांतरण करून मुस्लिम झाल्या व ‘जिहाद’ करण्यासाठी ISIS सारख्या दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी होण्यासाठी गेल्या, अशा मुलींना भारतात परत आणण्यासाठी सहानुभूतीची लाट निर्माण केली जाऊ शकते. मात्र, ब्रेनवॉश झालेल्या या मुली जगभरात इस्लामची सत्ता स्थापन व्हावी म्हणून स्वत: आतंकवादी होण्यासाठी गेल्या होत्या, हे आपण विसरता कामा नये. त्यामुळे, इस्लाम धर्म स्वीकारून पश्चात्ताप झाल्याने त्या परत येऊ इच्छितात की भारतात परत येणे हा देखील एखाद्या कटाचा भाग आहे, याची खात्री होऊ शकत नाही. थोडक्यात, आपल्याच सुरक्षिततेसाठी केंद्र सरकार या मुलींच्या बाबतीत ‘नो सिंपथी फॉर टेररिस्ट’ हे जे धोरण अवलंबत आहे त्याविरूद्ध भूमिका घेणारी एखादी मोहीम तर सुरू होत नाही ना? याबाबत आपण सावध असायला हवे. असो..

मुळ प्रश्न हा आहे की प्रेमामध्ये अशी फसवणूक का होते? आणि त्याचं साधं सरळ उत्तर हे आहे की आपण सावधगिरीने आपलं आयुष्य जगत नाही म्हणून. सदैव जागृत राहिलं तर चांगल्या माणसांप्रमाणेच दुनिया भामट्यांनी देखील भरलेली आहे, हे अगदी सहज लक्षात येऊ शकतं आणि नुसती प्रेमातलीच काय, कुठलीही फसवणूक टाळली जाऊ शकते. दोन-पाच वर्षांपूर्वी कुणी विचार तरी केला असेल का, की आपल्या आजूबाजूच्या महिला पब्जी (अतिशय हिंसक खेळ) खेळतील म्हणून? एकेकाळी लॉटरीचं दुकान म्हणजे अगदी वाईट काहीतरी असल्याच्या आविर्भावात झपाझप निघून जाणारे आपण आज पैसे लावून रमी सर्कल, तीन पत्ती खेळत आहोत? IPL वर सट्टा लावत आहोत? जगतोय आपण सावधतेने? आपल्याला गंडवून कष्टाने कमावलेला पैसा कुणीतरी अगदी सहज काढून घेतंय हे ज्यांना कळत नाहीये, त्यांना पूरेपूर षडयंत्र करून अवतीभोवती मोठ्या शिताफीने आवळले जाणारे फास खरंच ओळखू येतील?

राग नका येऊ देऊ, पण काय शिकताहेत मुलं आपल्याकडून? स्वच्छंदीपणा? आयुष्य म्हणजे टाइमपास आहे? धार्मिक स्थळांना भेटी देणं म्हणजे श्रध्देपेक्षा जास्त टुरिझम आहे? तरी बरं, ज्यांचं नाव निघालं की आपल्या सो-कॉल्ड सर्वधर्मसमभावाची गोची होते अशा हिंदूत्ववादी कार्यकर्त्यांनी मागच्या काही वर्षांत दबाव निर्माण केलाय. नाहीतर आपण, अर्धवट पुरोगामी थाटात आपल्याच सणावारांना खो-खो हसत होतो. वटसावित्री आणि सर्वपित्री आमवश्येचे संदेश आठवतात ना? आणि ते आपल्या तेहतीस कोटी देवांचं काय? ‘कुठल्याही मार्गाने ईश्वरापर्यंत पोहोचता येते’ अशी उदात्त आणि सहिष्णू शिकवण देणाऱ्या धर्मात, ज्याला ज्या स्वरूपात ईश्वराला पुजण्याची इच्छा होईल तितक्या देवता असणारच. यात हसण्यासारखे आणि नावं ठेवण्यासारखे काय आहे? आजकाल वैयक्तिक अधिकारांच्या फारच गप्पा चालल्या आहेत ना? मग, ‘हिंदू धर्म सोडून इतर कुणीच हव्या त्या स्वरूपात ईश्वराला पुजण्याचा वैयक्तिक अधिकार देत नाही’ इतकी साधी गोष्ट शिकल्या-सवरल्या माणसाला कळू नये?

कसला आलाय पॅन इस्लामीझ्म आणि कसले डोंबलाचे ते होलोलुलीया करणारे ख्रिस्ती पाद्री? हिंदू धर्माच्या उदात्त स्वरूपाची बरोबर कोण करू शकेल? आणि हिंदू धर्माने अन्याय केला वगैरे गप्पा मारणारांना तर पार उडवूनच लावूया. कारण, हा विषय आता चावून चोथा झालाय. मानवीय इतिहासात घडायच्या त्या घडामोडी घडून गेल्या आहेत आणि अन्यायकारक होतं ते मागे सोडून, आपण हिंदू कधीचेच पुढे आलो आहोत. त्यामुळे, स्वत:च्या विचारधारेप्रमाणे धड मार्गक्रमण व प्रगती करायची सोडून, येता जाता हिंदू धर्माला नावं ठेवण्यात स्वत:चं आयुष्य वाया घालवणाऱ्यांना यापुढे किंमत देण्याचं कारण नाही. असो..

द केरला स्टोरी बद्दल म्हणाल तर,’आपल्या पुढच्या पिढीला हिंदू धर्माची उदात्तता समजावून सांगणे’ एवढे एकच कर्तव्य जरी आपण केले, तरीही आपल्या मुली ‘लव जिहाद’ला बळी पडण्यापासून वाचतील. बाकी, प्रेम आणि प्रेमविवाहाला नकार कोण देतंय? मात्र, ‘प्रेम’ जरी नकळत होत असलं तरी प्रेमाच्या नावाखाली फसवणूक होऊ नये म्हणून सावधगिरी तर बाळगायलाच हवी ना? त्यामुळे, याच विषयावरील माझी ‘बाळा’ ही कादंबरी अवश्य वाचावी. प्रतिलिपी या ॲपवर ही कादंबरी मोफत उपलब्ध आहे. या विषयांवर मुलांशी संवाद कसा साधावा, हे समजून घेण्यासाठी पालकांनी सुध्दा ही कादंबरी वाचावी.

जाता जाता, ‘द केरला स्टोरी’च्या निमित्ताने ‘लव जिहाद’बद्दल जागरूकता निर्माण होऊन हे संकट टळेल‌, असे वाटत असले तरीही लढाई अजून संपलेली नाही. ‘लव जिहाद’ फक्त आपल्या मुलींनाच जाळ्यात ओढतोय, मात्र इथून पुढे सुरू होणाऱ्या लव GI’ या युद्धामध्ये ‘मुलं’ – ‘मुली’ असा भेद उरणारच नाही. आपल्यापैकी अनेकांना अजून माहिती देखील नसलेलं भारतीय संस्कृतीच्या विरोधातलं हे युद्ध आधीच सुरू झालंय. प्रतिपक्ष बलवान आणि अतिशय मुरलेला आहे. तो कशा पद्धतीने एक एक पाऊल पुढे टाकतोय, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न ‘जेंडर वॉर’ या कादंबरीच्या माध्यमातून मी सध्या करत आहे. शत्रूच्या चाली आपल्याला आधीच ओळखता आल्या, तर होणारे वार निश्चितच परतावून लावता येतील. या कादंबरीचे भाग जसजसे लिहिल्या जात आहेत, तसतसे प्रतिलिपीवर या ॲपवर उपलब्ध होत आहेत.