पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मिळालेल्या पदकाचा रंग उडाल्याचा प्रकार समोर आला आहे. ब्रिटनची कांस्यपदक विजेती यास्मिन हार्परने हा दावा केला आहे. अमेरिकेच्या स्केटबोर्ड संघातील खेळाडूंनीही याबाबत तक्रार केली आहे.
मात्र, पदकाचा रंग उडाल्याच्या घटनांवर अद्याप पॅरिस ऑलिम्पिक आयोजकांकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
ऑलिम्पिक स्पर्धेत देशासाठी पदक जिंकण्याचे स्वप्न प्रत्येक खेळाडूचे असते. यासाठी खेळाडू जीवापाड मेहनत घेतो. मात्र, हे ऑलिम्पिक पदक खराब निघाले, असल्याचा दावा ब्रिटनची कांस्यपदक विजेती यास्मिन हार्परने केला आहे. यास्मिनने सोशल मीडियावर या रंग निघून गेलेल्या आपल्या कांस्यपदकाचा फोटोही पोस्ट केला आहे. यास्मिनने १०० मीटर सिंक्रोनाइस स्प्रिंगबोर्ड स्पर्धेत कांस्य कमाई केली होती.
तसेच अमेरिकेच्या स्केटबोर्ड संघातील खेळाडूंनीही याबाबत तक्रार केली आहे. कांस्यपदकाचा केवळ रंगच उडाला नसून मागच्या बाजूने हे पदक तुटल्याचेही अमेरिकन खेळाडूंनी सांगितले. ‘हे काहीसे निराशाजनक आहे. केवळ एक आठवडा हे पदक चमकत होतं,’ असे यास्मिनने म्हटले.