जळगाव : गरोदर विवाहितेने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. शितल उर्फ रूपाली विजय कोळी (२२) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, शितल उर्फ रूपाली विजय कोळी (२२ ) या यावल तालुक्यातील मनवेल येथे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होत्या, दरम्यान, मंगळवार, ७ रोजी दुपारी घरातच छताच्या आडव्या लोखंडी एंगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. सदर प्रकार कुटुंबाच्या निदर्शनास येताच तीला तातडीने तेथून यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये आणण्यात आले.
यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. सदर महिला गरोदर होती तिच्या पोटात पुरुष जातीचे अर्भक होते, ते देखील यात दगावले आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात भगवान कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे करीत आहे.