तरुण भारत लाईव्ह । ८सप्टेंबर २०२३। नाशिक मधून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. दिंडोरी तालुक्यातील घराचा स्लॅब कोसळून आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामध्ये एक वृद्ध महिला जखमी झाली आहे. या घटनेने सर्वत्र शोककळा पसरली आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, दिंडोरी तालुक्यातील नळवाडपाडा येथील गुलाब खरे यांच्या घराचा काही भाग कोसळला. या स्लॅबखाली तीन जण दाबले गेले. या घटनेत नातू आणि आजोबाचा मृत्यू झाला. तसेच एक वृद्ध महिला या स्लॅब खाली दाबली गेल्याने ती गंभीररीत्या जखमी झाली असून तिला दिंडोरी तालुका आपत्ती व्यवस्थापन कशाच्या सदस्यांनी तत्परता दाखवीत सुरक्षितरित्या बाहेर काढले.
या घटनेची माहिती मिळताच नळवाड पाडाचे सरपंच हिरामण गवळी यांनी आपल्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांसह आणि काही ग्रामस्थांनी धाव घेतली. तहसीलदार पंकज पवार यांनी तत्काळ घटनास्थळी जात आपत्ती व्यवस्थापन कक्ष व ग्रामस्थांच्या मदतीने तात्काळ कारवाई केल्याने ढिगार्याखाली अडकलेल्या आजीची सुखरुप सुटका करण्यात यश आले.