धक्कादायक ! चक्कर येवून पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू; मनवेल आश्रमशाळेतील घटना

यावल ः तालुक्यातील मनवेल आश्रमशाळेतील नऊ वर्षीय विद्यार्थ्याचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली आहे. फुलसिंग पहाडसिंग बारेला (9, हिंगोणा, ता.यावल) असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.

यावल तालुक्यातील मनवेल येथे आदिवासी आश्रम शाळेत हिंगोणा येथील नऊ वर्षांचा फुलसिंग पहाडसिंग बारेला हा विद्यार्थी शिक्षण घेत होता. सोमवार, 5 ऑगस्ट रोजी शाळेत सकाळी त्याला चक्कर आल्याने तो खाली पडला. शिक्षकांनी तातडीने त्याला यावल ग्रामीण रुग्णालयात हलवले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत जावळे यांनी तपासणीनंतर मृत घोषित केले. नऊ वर्षीय मुलाच्या मृत्यूची बातमी समजताच खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गट व मनसेच्या कार्यकर्त्यांनी ग्रामीण रुणालय गाठून या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली तर आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, फुलसिंग बारेला याची रविवारी तब्येत खराब होती. त्याच्यावर औषधोपचार करण्यात आले होते. त्यानंतर सोमवारी सकाळी तब्येत आणखी खराब झाल्यानंतर यावल येथील रुग्णालयात पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले मात्र त्याचा मृत्यू नेमके कशामुळे झाला याचे कारण शवविच्छेदनानंतरच कळेल व त्यानंतरच कारवाईची दिशा ठरेल, असेही त्यांनी सांगितले.