जळगाव । जळगाव शहरात मोकाट कुत्र्यांचा उच्छाद वाढला असून याच दरम्यान, एक धक्कादायक घटना समोर आलीय. शहरातील वाल्मिक नगरात मध्यरात्री मोकाट कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात ११ बकऱ्यांना ठार केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून यात शेळी मालकांचे जवळपास दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे. याबाबत मात्र अद्यापपर्यंत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.
याबाबत असे की, शहरातील वाल्मिक नगर परिसरातील वडामया राहणारे प्रकाश चिंतामण कोळी यांच्या मालकीच्या ११ बकऱ्या शनिवारी रात्री त्यांच्या घराच्या जवळ असलेल्या गोठ्यात बांधण्यात आलेल्या होत्या. मात्र दरम्यान मध्यरात्री मोकाट असलेल्या कुत्र्यांनी गोठ्यात घुसून ११ बकऱ्यावर हल्ला करून त्यांना ठार केलं. ही बाबत दुसऱ्या दिवशी रविवारी ३१ मार्च रोजी पहाटे ६ वाजता हा प्रकार लक्षात आल्याने शेळी पालन करणारे प्रकाश कोळी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी आक्रोश केला. यावेळी मोकाट कुत्र्यांमुळे शेळी मालकांचे अंदाजे दीड ते दोन लाखांचे नुकसान झाले आहे.
दरम्यान महापालिकेच्या दुर्लक्षपणामुळे मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी परिसरातील नागरीकांकडून केली जात आहे. यावेळी तलाठी राहुल सोनवणे यांनी पाहणी करून घटनेचा पंचनामा केला आहे. शासनाकडून तातडीने आर्थीक मदत देण्यात यावी अशी मागणी कोळी कुटुंबियांनी केली आहे. याप्रकरणी पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.