तरुण भारत लाईव्ह । ७ ऑक्टोबर २०२३। अपघाताचे प्रमाण हे वाढले असून त्यामध्ये मृत होण्याची संख्या देखील वाढली आहे. अशातच चाळीसगाव मधून एक अपघाताची बातमी समोर आली आहे. रुग्णालयातील काम आटोपून घराकडे निघालेल्या तरुणाचा डंपरच्या खाली आल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संदीप राजेंद्र सूर्यवंशी असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील खडकी येथे वास्तव्यास असलेले संदीप राजेंद्र सूर्यवंशी हे शुक्रवार, सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास पत्नी गायत्रीसोबत येथून दुचाकीने जामनेर येथे आले होते. जामनेर येथील रुग्णालयातील काम आटोपून तो पत्नीसह दुचाकीने पाचोर्याकडे येत असतानाच सांगवी गावाजवळील बस स्थानकाजवळ संदीपची दुचाकी गतिरोधकावर आदळली व नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरल्याने पत्नी गायत्री ही विरुध्द बाजुला पडली पण संदीप हे रस्त्यावर पडले व त्याचवेळी कुर्हाडच्या दिशेने धरधाव डंपर गेल्याने वाहनाच्या मागील चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
याप्रकरणी पिंपळगाव पोलिस स्टेशनमध्ये अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कॉन्स्टेबल अरविंद मोरे व शैलेंद्र चव्हाण हे करीत आहे.